पावसाने ओढ दिली असली तरी श्रावणी ऊन-पावसाचा खेळ सुरूच असून, कोयना शिवसागर वगळता जवळपास सर्वच धरणे भरून वाहिली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्पात २४५ टीएमसी म्हणजेच ९३.६१ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पात असलेला पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी- कोयना  ९४ (९०), वारणा ३२.२६ (९४), दुधगंगा २३.०६ (९१), राधानगरी ८.१ (९६), धोम १२.२१ (९०.४५), कण्हेर ९.५६ (९४.६७), उरमोडी ९.२९ (९३), तारळी ४.८८ (८५.५५), धोम-बलकवडी ३.८५ (९४.२६) तर, सातारा जिल्ह्यच्या हद्दीवरील पुणे जिल्ह्यातील वीर ९.४१ (१००), नीरा देवघर ११.७३ (१००), भाटघर २२.१९ (९४.४१).  
सध्या धोम, कण्हेर, वारणा, राधानगरी, धोम बलकवडी व निरा देवघर या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी तो सरासरीपेक्षा ज्यादाच असल्याने ठिकठिकाणचे प्रकल्प क्षमतेने भरून वाहिले आहेत. आजवरचा पाऊस खरिपालाही उपयुक्त ठरला आहे. कोयना शिवसागरात चालू  हंगामातील ७७ दिवसांत ८८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गतवर्षी  हीच आवक १३८ टीएमसी म्हणजेच कोयना धरणाच्या क्षमतेच्या १३१.११ टक्के झाली होती. तर, कोयना धरणातून ६८ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले होते. कोयनेच्या पाणलोटात यंदा गतवर्षीपेक्षा १ हजार मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे.
कोयना धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठावरील पावसाची रिपरिप ओसरली आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ५ एकूण ४,०३२, नवजा विभागात १० एकूण ४,९३३ तर, महाबळेश्वर विभागात ८ एकूण ३,७८९ मि. मी. पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस ४,२५१.३३ मि. मी. नोंदला गेला आहे. गतवर्षी कोयनानगर ४,७९५, महाबळेश्वर ५,१८० तर नवजा ५,७०६ मि. मी. सरासरी ५,२२७ मि. मी. पावसाची नोंद होताना, धरणाचा पाणीसाठा ९८.३५ टीएमसी म्हणजेच ९३.४५ टक्के नोंदला गेला होता.

Story img Loader