देशातील पंधरा राज्यात आधारकार्ड योजनेचे ८० टक्के तर, महाराष्ट्रात ९५ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती, भारतीय ओळख प्राधिकरणाचे (आधार) महासंचालक यु. पी. एस. मदान यांनी दिली.
मदान यांनी आज साईदरबारी हजेरी लावली. यानंतर त्यांनी राज्याचे ओळख (आधार) प्राधिकरणाचे प्रमुख अजयभूषण पांडे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव आदींसमवेत बैठक घेवून आधार कार्डचा उपयोग भाविकांना दर्शन व अन्य सुविधा देण्याकरीता कसा करता येईल याबाबत चर्चा केली. यात ग्रामस्थांना दर्शनासाठी व कर्मचाऱ्यांच्या हजेरी व उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली.
यानंतर निवडक पत्रकारांशी बोलताना मदान यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह देशात ८० कोटी नागरिकांना आधार कार्डचे वाटप करण्यात आले आहे. यात १८ वर्षांपुढील ५० टक्के नागरिकांचा समावेश आहे. एकीकडे आधार अनेक सरकारी योजनांना िलक करण्यात येत असताना सर्वोच्च न्यायालयाने मात्र अद्याप आधारची सक्ती करण्यास नकार दिला आहे. याबाबत त्यांना छेडले असता मदान यांनी सांगितले की, या योजनेबाबत न्यायालयाच्या मनात अद्याप काही शंका आहेत. याशिवाय या संदर्भात काही याचिकाही दाखल आहेत. येत्या जुलैत सुनावणी असून त्यावेळी आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करु. मात्र आधार हा ओळखीचा पुरावा आहे. तो नागरिकत्वाचा पुरावा करण्याबाबत कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंध, अपंग, वृध्द सर्वाचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत. याशिवाय ही सेवा सर्वाना नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही मदान यांनी या वेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा