महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे सावट असलेल्या ९५व्या अ.भा.मराठी नाटय़संमेलनात सीमाप्रश्नावर कोणतीच भूमिका घेतली जाणार नाही, हे स्पष्ट झाल्याने संतप्त झालेल्या मराठी भाषकांनी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह सयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणांनी काही काळ अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार, महापौर आणि उपमहापौर यांना संमेलनात सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात न आल्याचा रागही त्यामागे होता. अखेरीस एकीकरण समितीचे किरण ठाकूर, महापौर महेश नाईक आणि उपमहापौर रेणू मुतकेकर यांना सन्मानाने व्यासपीठावर बसविण्यात आल्यावर घोषणाबाजी थांबली. प्रदीर्घ नाटय़दिंडीने ९५व्या नाटय़संमेलनाची शानदार सुरुवात झाली. परंतु ज्यांच्या दर्शनासाठी बेळगावकर आसुसलेले होते, त्या नाटय़कलावंतांची दिंडीतील उपस्थिती मात्र तुरळकच होती. सजवलेल्या बग्गीतून मावळते संमेलनाध्यक्ष अरुण काकडे आणि नियोजित अध्यक्ष फैयाज शेख यांची देखणी मिरवणूक काढण्यात आली. 

नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या प्रास्ताविकानंतर स्वागताध्यक्ष अशोक साठे यांचे भाषण झाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मराठी भाषकबहुल बेळगाव-कारवार आदी भागांत आंतरप्रांतीय सांस्कृतिक देवाणघेवाण वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त करून साठे पुढे म्हणाले की, त्यासाठी सीमाभागातील मराठी सांस्कृतिक संस्थांना महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी आर्थिक पाठबळ द्यावे.
बेळगाव-कारवार आदी सीमाभागांतील मराठी माणसांचे मला कौतुक वाटते. महाराष्ट्र-कर्नाटक प्रादेशिक सीमेने पाच दशकांपूर्वी आपली ताटातूट केली असली तरी आपली मने मात्र अभंग आहेत. याचे कारण तुमची-आमची नाळ याच मराठी मातीत पुरलेली आहे. आणि नाळेचे कुणा प्रांताशी किंवा जातीशी नाते नसते, तर मातीशी असते, असे उद्गार ९५व्या नाटय़ संमेलनाचे उद्घाटक शरद पवार यांनी काढले.सीमावासीयांनी या नाटय़ संमेलनात घोषणाबाजी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्या पाश्र्वभूमीवर शरद पवार काय वक्तव्य करतात, याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले होते. परंतु शरद पवार यांनी सीमावादाबद्दल चकार शब्द न काढता आपले छापील भाषणच वाचून दाखविले.

Story img Loader