सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळी कारभार पुन्हा उजेडात आला आहे. बिएस्सी द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राच्या परीक्षेत ५० गुणांच्या पेपरसाठी चक्क ९९ गुण देण्यात आल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर राजकारणात येणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…
जुळे सोलापुरातील वसंधरा महाविद्यालय आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील माऊली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवाढीचा अनुभव घेतला आहे. गेल्या आक्टोंबरमध्ये बीएस्सी द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असता गुणपत्रिका पाहून विद्यार्थी व पालकांना धक्का बसला. ५० गुणांच्या पेपरसाठी चक्क ८२ गुणांपासून ९९ गुण बहाल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. विद्यापीठ परीक्षा विभागात अधुनमधून गोंधळाचा कारभार समोर येतो. त्यात आता गुणवाढीची भर पडली आहे. दरम्यान, परीक्षेत जादा गुण मिळाल्याचा प्रकार केवळ कारकुनी चुकांमुळे झाला आहे. त्यात योग्य दुरूस्ती केली जाईल, असे विद्यापीठ परीक्षा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.