कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी गुरुवारी अतिशय चुरशीने मतदान झाले. तब्बल ९९.८१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले असल्याने आता निकालाकडे लक्ष वेधले आहे. मतदानानंतर उभय आघाडीकडून आपल्याला मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. सत्ताधारी आघाडीने ताकद पणाला लावून मतदान करवून घेतले असल्याने त्यांची बाजू वरचढ दिसत असली, तरी क्रॉस वोटिंगचा फटका बसण्याची शक्यता जाणवत आहे. विरोधी गटाचे भवितव्य क्रॉस वोटिंगवरच राहणार असल्याचे आज मतदानाचा कल पाहता दिसून आले. शुक्रवारी मतमोजणी होणार असून जिल्ह्यातील राजकारणात आमदार महादेवराव महाडिक हे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट होणार आहे. मतदानावेळी राजकीय टोलेबाजी करणारे पाटील या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना टोला देणार का याकडे लक्ष वेधले आहे.
गोकुळ दूध संस्थेवरील वर्चस्वासाठी गेल्या महिनाभरापासून राजकीय संघर्ष सुरू होता. गोकुळवरील आमदार महाडिक यांच्या एक हाती नेतृत्वाला सतेज पाटील यांनी आव्हान दिले होते. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने मताचा दर काही लाखांपर्यंत पोहोचला होता. गोकुळवरील वर्चस्वाची लढाईचे प्रत्यक्ष चित्र शुक्रवारी मतमाजणीच्या वेळी पाहायला मिळाले.
सेंट झेवीअर हायस्कूल येथे सकाळपासूनच मतदानासाठी ठरावधारक मतदार येत राहिले. सत्तारूढ गटाने सहलीसाठी गेलेल्या मतदारांना रांगेने मतदानासाठी आणले होते. पिवळया रंगाच्या टोप्या परिधान केलेले मतदार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान करणार असल्याचे दर्शवित होते. ही संख्या अंमळ जास्त दिसत होती. तर विरोधी गटाचे मतदार पांढरी टोपी परिधान करून आले होते. या टोप्यांवर पर्वितन पॅनेल असा उल्लेख करण्यात आला होता. प्रचंड घोषणाबाजी करीत मतदानाची प्रक्रिया पार पडली. अनेकदा यातून तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद चिघळणार नाही याची दक्षता घेतली होती.
राजकीय टोलेबाजी
मतदान केंद्राच्या बाहेर सत्तारूढ व विरोध गटाचे नेतेमंडळी समोरासमोर उभी होती. आमदार महाडिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन.पाटील, माजी अध्यक्ष अरुण नरके, अध्यक्ष दिलीप पाटील आदी तर विरोधी गटातील सतेज पाटील, माजी मंत्री विनय कारे, संजय मंडलिक आदी प्रमुख मतदारांना अभिवादन करीत होते. मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना उद्देशून सतेज पाटील यांनी ‘आमच्याकडे लक्ष द्या’ असे आवाहन करीत होते. ते पाहून नरके यांनी ‘मतदानाला चालले आहेत ते किती आहेत, मोजून घ्या’ अशा शब्दात टोला लगावला. माजी मंत्री हसन मुश्रीफ मतदानाला चालले असताना सतेज पाटील यांनी त्यांना ‘आमचा परा फेडावा’ अशी शेरेबाजी केली. त्यावर मुश्रीफ यांनी आता आपण सत्ताधाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत, पुढच्या वेळी (जिल्हा मध्यवर्ती बँक) परा नक्की फेडू, असा चिमटा काढला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा