नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या एका ५२ वर्षीय ओमायक्रॉनबाधित रूग्णाचा हृदयिवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत माहित दिली गेली आहे.

१२ डिसेंबर रोजी ही व्यक्ती नायजेरियामधून पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाली होती. यानंतर हृदयाच्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहिला धक्का सौम्य होता मात्र दुसऱ्या धक्क्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला.

१२ डिसेंबर रोजी नायजेरियामधून आल्यानंतर १७ डिसेंबर रोजी या व्यक्तीला हृदयाशी संबंधित त्रास सुरू झाला होता. म्हणून या व्यक्तीस परदेशी रूग्णांसाठी राखीव असलेल्या भोसरी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी वायसीएम रूग्णालयातील रुबी एलकेअर कार्डियाक सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं. उपचारा दरम्यान करोनाची लक्षण आढळून आल्याने, करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटव्ह आला होता. त्यानंतर ओमायक्रॉनची देखील चाचणी केली गेली व हा रिपोर्ट येणे बाकी होते, दरम्यान या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती. मात्र, २८ डिसेंबर रोजी पुन्हा हृदयविकाराचा दुसरा झटका आला आणि या व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान आजच्या NIV अहवालातून असे दिसून आले आहे की त्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली होती. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचेही समोर आले आहे. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये आजपर्यंत २६ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळून आले असून, या पैकी १५ रूग्ण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत.