कराड : पुणे- बंगळुरु महामार्गावर कराड लगतच्या मलकापूर येथे शुक्रवारी सायंकाळी अचानक मोटारकारने पेट घेल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने चालकासह घटनास्थळावरील लोकांच्या प्रसंगावधानामुळे तिघांचे प्राण वाचले. मात्र, मोटारगाडी जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.मलकापुरमधील शिंदे होंन्डा शोरूमसमोर लोकांनी बर्निंग कारचा थरार अनुभवला. कोल्हापूरकडून पाटणच्या दिशेने निघालेल्या चालत्या कारला अचानक आग लागली. या आगीत पूर्णतः जळाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाटण येथील युवराज पाटील मोटारकार (क्र. एमएच. ०४ बीएस ६९८२) मधून पत्नी व मुलगीसह कामानिमित्त कोल्हापूर येथे गेले होते. काम आटोपून ते परत पाटणकडे निघाले होते. पूणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर शहराच्या हद्दीत त्यांच्या कारच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कार महामार्गाकडेला थांबवली. तोपर्यंत कारच्या पुढील भागातून धुराचे लोट बाहेर पडत होते.
अचानक मोटारकार पेटल्याचे लोकांच्या लक्षात आले. सध्या सुरु असलेल्या महामार्ग रुंदीकरण कामाचे ठेकेदार डीपी जैन कंपनीचे दस्तगीर आगा, संभाजी घुटुगडे, दिलीप कुमार, निलेश, अनिल कांबळे, राकेश, अभिषेक, संभाजी लाखे, निलेश औंधकर, शंकर लाखे, गणेश खोत यांच्यासह व्यावसायिक व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. डीपी जैन कंपनीच्या सिमेंट काँक्रिट मिक्सर गाडीतील पाण्याचे फवारे मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला.कराड पालिकेचा अग्निशामक बंब सुध्दा दाखल झाला. पण तो पर्यंत मोटारगाडीचा काळकुट झालेला सांगाडा शिल्लक राहिला होता.