परभणी : पाथरी तालुक्यातील झरी ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव दाखल केलेल्या ७ विहिरींचे कार्यारंभ आदेश मंजूर करण्यासाठी एका विहिरीचे ५ हजार याप्रमाणे एकूण ३५ हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई गुरुवारी (दि.२७) दुपारी केली. एका ३८ वर्षीय तक्रारदार व्यक्तीने गुरुवारी याबाबत तक्रार अर्ज दिला होता.
आरोपी ईश्वर बाळू पवार (वय ५६ वर्षे, पद गटविकास अधिकारी, नेमणूक पंचायत समिती, पाथरी ता.पाथरी जि.परभणी मूळ राहणार मुक्काम तिवासपाडा पोस्ट साखरे ता.विक्रमगड जि.पालघर ) आणि गोवर्धन मधुकर बडे (वय ३० वर्षे, पद सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, नेमणूक पंचायत समिती कार्यालय, पाथरी. मूळ रा.केकर जवळा, ता.पैठण जि.छ्त्रपती संभाजीनगर (बाह्यस्रोत कंत्राटी ग्रामविकास विभाग) या दोघांवर कायदेशीर कारवाई झाली आहे.यातील तक्रारदाराने पाथरी पंचायत समितीत झरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेले ७ विहिरींचे कार्यारंभ आदेश मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत.
यासंदर्भातील तक्रार गुरुवारी (दि.२७) प्राप्त झाली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,परभणी येथे लिखित तक्रार दिली होती. तक्रारदार हे लाचेची रक्कम देण्यासाठी पंचायत समिती पाथरी येथे पंचासह गेले असता आरोपी गोवर्धन बडे यांनी त्यांना सांगितले की, बि.डी.ओ साहेबांनी पैसे माझ्याकडे द्यायला सांगितले आहे. त्यावरून आरोपी गोवर्धन बडे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये लाचेची रक्कम आरोपी ईश्वर पवार यांच्या सांगण्यावरून स्वतः स्विकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह पकडण्यात आले. आरोपी ईश्वर पवार आणि गोवर्धन बडे यांचेविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करण्यात येणार आहे. सापळा/तपास अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीचे पोलीस निरीक्षक श्री. अल्ताफ मुलाणी यांनी काम पाहिले.