ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील राजकीय द्वंद्व अवघ्या राज्याला माहीत आहे. शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. तेव्हापासून ठाकरे कुटुंबीयातील राजकीय वाद सार्वजनिक व्यासपीठावरूनही दिसून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या राजकीय वादांमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही जाहीर व्यासपीठांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. आता त्यांनी विक्रोळीतील एका महोत्सवातून उद्धव ठाकरेंवर टीकास्र डागलं.
मनसे विक्रोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाला शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी उद्घाटनावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “या महिन्याच्या दहा तारखेला एक सर्कल पूर्ण झालंय. शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
१० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता दिली. नार्वेकरांच्या या निकालावरूनच शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
हेही वाचा >> राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, म्हणाल्या…
डिसेंबर महिन्यांत शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली होती. आदित्य ठाकरे असं काही करतील असं वाटत नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले होते. मात्र, त्यानंतर लागलीच धारावी पूनर्विका प्रकल्पावरून शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
काय म्हणाल्या होत्या शर्मिला ठाकरे?
“आभार मानण्याची वेळ मला उद्धव ठाकरेंनी आयुष्यात कधीच दिली नाही. किणी प्रकरणापासून आजपर्यंत जेवढ्या वेळेला मिळेल तेव्हा आम्हाला ते चिमटे काढत असतात. निदान जो भाऊ तुमच्या बरोबर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवला असतात ना तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ असती. जी आता त्यांच्यावर आली आहे. मी माझ्या पुतण्यावर (आदित्य ठाकरे) विश्वास ठेवला. मी सांगितलं की तो असं काही करेल वाटत नाही. पण तुम्ही ज्या भावाबरोबर मोठे झालात आयुष्यभर त्याला किणी प्रकरणाच्या वेळी का मदत केली नाही? आजपर्यंत कुठलीही वेळ आली की आम्हाला टोमणे मारतात. तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा. मग आम्हीपण आभार मानू.” असं वक्तव्य शर्मिला ठाकरे त्यावेळी म्हणाल्या होत्या.
हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या भावावर विश्वास दाखवला असता तर…”, शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
राज आणि उद्धव एकत्र येणार?
तसंच, गेल्याच महिन्यात ठाकरे बंंधू एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यामुळे हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येणार का असाही प्रश्न सातत्याने विचारला गेला. त्यावेळी या भेटीबाबत शर्मिल ठाकरे म्हणाल्या होत्या, “माझ्या नंणदेच्या मुलाचा साखरपुडा होता. घरातील सर्व लोक अशावेळी एकत्र येतात. माझी नणंद राजकारणात नाहीय. राज जसा तिचा भाऊ आहे, तसा उद्धवही भाऊ आहे.” तसंच, उद्धव आणि राज एकत्र येणार का? असं विचारलं असता शर्मिला ठाकरे यांनी “बघुया…”, एवढंच एका शब्दात उत्तर दिलं होतं.