पिंपरी : शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील पराकोटीला गेलेला वाद आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने मावळ लोकसभेने सर्वाचे लक्ष वेधले आहे.

पुणे जिल्हय़ातील मावळ, चिंचवड, पिंपरी आणि रायगड जिल्हय़ातील कर्जत, पनवेल, उरण असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला मावळ लोकसभा मतदारसंघ मुंबईपर्यंत गेला आहे. शहरी-ग्रामीण असा मिश्र भाग तसेच भूमिपुत्र, शेतकरी, परप्रांतीय, आगरी, आदिवासी, नोकरदार असे संमिश्र चित्र मतदारसंघात आहे. पिंपरी-चिंचवडचे मोठे क्षेत्र यात समाविष्ट आहे. भाजप, शिवसेना, शेकाप आणि राष्ट्रवादी या पक्षांची वेगवेगळय़ा ठिकाणी प्रभाव क्षेत्रे आहेत. तुलनेने इतर पक्षांची ताकद मर्यादित दिसून येते.

२००९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर हे राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांचा पराभव करून निवडून आले. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने शेवटच्या क्षणी बाबरांना उमेदवारी नाकारून बारणे यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या बाबरांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. तेव्हाचे राष्ट्रवादीशी संलग्न अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. मात्र, शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर ते रिंगणात उतरले. राष्ट्रवादीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. तिरंगी लढतीत बारणे यांनी जगताप व नार्वेकरांचा दारुण पराभव केला. नंतर, नार्वेकरांनी मतदारसंघाशी संबंध ठेवला नाही. तर, जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत ते चिंचवडमधून पुन्हा आमदार झाले. खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यात सातत्याने खटके उडताना दिसतात.

मावळवर भाजपने दावा केल्यापासून युतीतील कलगीतुरा नव्याने सुरू झाला. या वादाचा फायदा घेण्यासाठी अजित पवारांनी पार्थच्या उमेदवारीचे गणित डोक्यात ठेवून मावळात चाचपणी केली आहे. पार्थ यांचा मावळच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. मात्र ते रिंगणात आल्यास अजित पवार हेच उमेदवार असल्याप्रमाणे परिस्थिती राहणार आहे. पवार १९९१ पासून मावळ आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. २००२ पासून १५ वर्षे पिंपरी पालिकेत त्यांचीच एकाधिकारशाही होती. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या आमदारद्वयीने पिंपरी पालिका खेचून भाजपकडे आणली. पाच वर्षांपूर्वी अस्तित्वासाठी झगडणाऱ्या भाजपची ताकद सध्या वाढली आहे. तर, राष्ट्रवादी तुलनेने दुबळी झाली आहे.

स्थानिक राजकारणाचा आढावा घेतल्यास, पक्षनिष्ठा नावाचा प्रकार अभावानेच दिसतो. व्यक्तिपूजा हेच येथील राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. त्यामुळे या पट्टय़ातील प्रभावशाली नेत्यांनी अनेकदा पक्ष बदललेले आहेत. सध्या सत्ता असलेल्या भाजपमध्ये मोठी गर्दी झाली असून त्यात पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीतून आलेल्यांचा भरणा जास्त आहे. आमदार जगताप, लांडगे यांच्यासह एकमेकांच्या विरोधात लोकसभा लढलेले गजानन बाबर आणि आझम पानसरेदेखील भाजपमध्ये आले आहेत. ज्यांचे मूळ राष्ट्रवादीत आहे, त्यांच्यावर पवारांची भिस्त आहे. त्यामुळे त्यांना गोंजारण्याचे काम सध्या सुरू आहे.

शिवसेनेच्या उमेदवारीसाठी बारणे यांना वर्षांपूर्वीच हिरवा कंदील मिळाला होता. त्यामुळे ते यापूर्वीच तयारीला लागले. राष्ट्रवादीकडून पिंपरीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी तयारी सुरू केली होती. मात्र, पार्थचे नाव चर्चेत आल्यापासून त्यांनी आवरते घेतले. अजित पवार मात्र पार्थच्या उमेदवारीचे अजून नक्की नाही, असेच सांगतात.

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे

पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बांधकामे, पालिकेतील भ्रष्टाचार, शास्ती कर, संरक्षण खात्याकडील प्रलंबित प्रश्न, वाढती गुन्हेगारी, पाणीटंचाई, मावळ बंद नळ योजना, मावळातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, नियोजित हायपरलूपसाठी जमिनी देण्यास विरोध, जमीन परतावा, पनवेल सिडकोची बांधकामे, औद्योगिक पट्टय़ातील मंदी, जेएनपीटीच्या समस्या, उरण येथील मच्छीमारांचे प्रश्न, रेल्वे प्रवाशांच्या समस्या असे मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.

रेल्वे तसेच संरक्षण खात्याच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा केला. किल्ल्यांचे संवर्धन, पर्यटनाला चालना दिली. पिंपरीतील हिंदूस्थान अँटिबायोटिक्स कामगारांना केंद्राकडून १०० कोटी आणि खालापूरच्या हिंदूस्थान फर्टिलायझर केमिकलच्या कामगारांना ९३ कोटी मिळवून दिले. क्रांतिवीर चापेकर यांचे टपाल तिकीट सुरू केले. पिंपरीत पासपोर्ट केंद्र सुरू केले. पनवेल केंद्रास मंजुरी मिळवली. पवना धरणात साचलेला गाळ वैयक्तिकरीत्या काढून घेतला. एमआयडीसीचे शिक्के असलेली मावळातील शेतकऱ्यांची ७३२ हेक्टर जमीन वगळण्यासाठी पाठपुरावा केला. घारपुरी लेण्यांचा पर्यटन विकास क्षेत्रात समावेश केला. पनवेल-उरण जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग आठपदरी करण्यास मंजुरी मिळवली. पुणे-लोणावळा लोकलच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकसाठी सर्वेक्षण पूर्ण केले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. खासदार निधीतून जनहिताचीच कामे केली. सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार पाचही वर्षे मिळाला.

– श्रीरंग बारणे (खासदार, शिवसेना)

मावळचे खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांना कसलीही छाप पाडता आली नाही. मतदारसंघात त्यांचा संपर्क नाही. त्यांच्या खासदार निधीतून काही कामे झाली नाहीत. मतदारसंघात काय विकासाची कामे केलीत, हे त्यांनी दाखवून द्यावे. पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी त्यांना भरभरून मते दिली. मात्र, शहरवासीयांसाठी त्यांनी काही केले नाही. मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. संपूर्ण मतदारसंघातील प्रवासी वाहतुकीचे प्रश्न गंभीर आहेत. मतदारसंघातील महत्त्वाचे विषय प्रलंबित आहेत, त्याकडे त्यांचे लक्ष नाही. मावळसाठी पार्थ पवार राष्ट्रवादीचे उमेदवार होणार असतील, तर आम्हा इच्छुकांची काहीच हरकत नाही.

– संजोग वाघेरे शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी

Story img Loader