सांगली : रेठरे (ता.वाळवा) परिसरात पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे पार्थिव वन विभागाला आढळले असून त्यांचे पंजे व नखे गायब असल्याने त्यांची हत्या झाल्याचा संशय व्ययत करण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी पोलीसांच्या श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे.
रेठरे परिसरात उसाच्या फडात उसतोड सुरू असताना बिबट्या व पिले आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी रात्री रेठरे वन क्षेत्राच्या परिसरात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. गुरूवारी पार्थिवाचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळी बिबट्याचे पंजे व नखे गायब झाली असल्याचे आढळून आले. यामुळे या बिबट्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून आले.वन विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास पोलीसांच्या श्वान पथकाच्या मदतीने करण्यात येत आहे.