एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : सोलापूर विमानसेवेच्या प्रश्नावर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी पाडून टाकण्याचा आणि ५२ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेला सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडण्याचा डाव आखण्यात आला आहे. या माध्यमातून कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असताना आता काडादी यांच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कुटुंबीयही धावून आले आहे. या घडामोडींमागे आगामी सोलापूर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची समीकरणे दडली आहेत, असे मानले जाते.
होटगी रस्त्यावरील जुन्या आणि आकाराने खूपच छोटय़ा अशा विमानतळाच्या शेजारची सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना गेली ५२ वर्षे कार्यरत आहे. तेथेच कारखान्याचा सहवीज निर्मितीचा प्रकल्पही आहे. या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी विमानसेवेला अडथळा ठरते म्हणून ही चिमणी पाडून टाकण्याची मागणी होत आहे. त्यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून आंदोलन होत आहे. मात्र दुसरीकडे सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली तर कारखाना कायमचा बंद होण्याच्या भीतीमुळे कारखान्याचे २७ हजार शेतकरी सभासद आणि कामगार एकवटून चिमणी पाडायला विरोध करीत आहेत. त्यांचेही प्रतिआंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्यात सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी वाचवावी आणि सोलापूरच्या जुन्या विमानतळाला भक्कम पर्याय असलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाची उभारणी लवकर करावी, या मागणीसाठी सिद्धेश्वर कारखान्याच्या शेतकरी सभासद व कामगारांनी विराट मोर्चाही काढला होता. या प्रश्नावरील आंदोलन व प्रतिआंदोलनाच्या निमित्ताने सिद्धेश्वर कारखान्याचे धर्मराज काडादी आणि भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला आहे. वीरशैव लिंगायत समाजाचे स्थानिक नेतृत्व करण्याच्या ईर्षेतून हा सुप्त संघर्ष पाहायला मिळतो.
विमानसेवा आणि सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी प्रश्नावर आमदार विजय देशमुख यांचा अपवाद वगळता भाजपचे जिल्हाध्यक्ष, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, शिवशरण पाटील, आमदार सुभाष देशमुख यांचे बहुतांशी समर्थक यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, दोन्ही काँग्रेसचे स्थानिक नेते, दोन्ही शिवसेना आदी सर्वपक्षीय समर्थन काडादी यांच्या बाजूने उभे राहिले आहे. काडादी यांनीही आयुष्यात प्रथमच आक्रमक पवित्रा घेत आमदार विजय देशमुख यांचा थेट नामोल्लेख टाळत नेतृत्व बदलण्याचा निर्धार केला आहे.
रोहित पवार यांचा दौरा
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे कुटुंबीयही आता काडादी यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहे. आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासात जाऊन त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.