सोलापूर : गेल्या महिन्यापासून राज्यात कांद्याचे दर कोसळले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अत्युत्तम, दर्जेदार कांद्याचा दर प्रतिक्विंटल १४०० रुपये, तर साधारण कांद्याचा दर प्रतिक्विंटल जेमतेम ६०० रुपये एवढा खालावला आहे. यातही स्वीकारला जाऊ शकत नाही, अशा गोटीसारख्या कमी आकाराच्या, कच्चा आणि पापुद्रे निघालेल्या कांद्याला अवघे शंभर रुपयांचा दर मिळतो. अशा हलक्या दर्जाचा कांदा विकायला आणणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तर उलट शेतकऱ्यांच्याच अंगलट येते. यातच विकलेल्या कांद्याचे पैसे हाती पडत नाहीत, तर उलट व्यापाऱ्याला जादा पैसे देऊन शेतकऱ्याला रिकाम्या हाताने परतावे लागते. अशीच घटना शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपूरच्या बंडू भांगे या शेतकऱ्याच्या बाबतीत घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंडू भांगे यांनी ८२५ किलो कांदा ५० पिशव्या भरून सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कांदा व्यापारी एस.एन. जावळे यांच्याकडे विक्रीसाठी आणला होता. त्यांचा कांदा हलक्या दर्जाचा असल्यामुळे प्रतिक्विंटल शंभर रुपये दराने विकला गेला. ८२५ किलो कांद्यासाठी ८२५ रुपये शेतकरी बंडू भांगे यांना मिळणार होते. परंतु, हमाली – ६५.१८ रुपये, स्त्री हमाली – २५.५० रुपये, तोलाई – ३८.७८ रुपये आणि वाहतूक खर्च – ६९७ रुपये असा एकूण ८३६.४६ रुपये खर्च झाला. म्हणजेच एकूण कांद्याच्या विक्रीमूल्यापेक्षा १.४६ रुपये जादा खर्च झाला. त्यामुळे ८२५ किलो कांदा विकणारे शेतकरी बंडू भांगे यांच्या हातात एकही पैसा पडला नाही. तर उलट त्यांना एक रुपया व्यापाऱ्याकडे देणे भाग पडले आहे.

छायाचित्र – लोकसत्ता टीम

हेही वाचा – सांगली : डॉक्टरांच्या गैरहजेरीत शिपायांकडून उपचार

यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी समाज माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडताना बंडू भांगे यांच्यावर कोसळलेल्या संक्रांतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. अलीकडे राज्यात सर्वत्र कांद्याचे दर गडगडले असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचा विचार करून शासनाने प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

हेही वाचा – “खोक्यांचे व्यवहार करतानाचे उद्धव ठाकरेंचे कॅसेट…”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

बंडू भांगे यांच्यासारखाच कटू प्रसंग बोरगाव येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांच्यावरही बेतला होता. ५१० किलो कांदा विकल्यानंतर उचल ४३० रुपये, हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च कपात करून चव्हाण यांच्या पदरात अवघ्या दोन रुपयांचा धनादेश पडला होता. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत गेल्या डिसेंबर व जानेवारीत कांद्याची विक्रमी आवक झाली होती. जानेवारीच्या अखेरीस मात्र कांदा दर गडगडला. प्रतिक्विंटल २५०० रुपये सरासरी दराचा कांदा जेमतेम ८०० रुपये दराने विकला जाऊ लागला. त्यानंतर चालू फेब्रुवारीत तर दरघसरण सुरूच असून दररोज ४५ हजार ते ५० हजार क्विंटल कांदा आवक होत असताना कमाल दर १४०० रुपये, तर सरासरी दर मात्र केवळ ६०० रुपयेच मिळत आहे. यात हलक्या दर्जाच्या कांद्याला तर अवघे शंभर रुपये दर दिला जातो. शंभर रुपयांचा हा निचांकी दर मिळण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. शेतकऱ्यांनीही असा अतिशय हलक्या दर्जाचा कांदा बाजारात आणू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात.