नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील तलावावर रविवारी सकाळी दहा परदेशी राजहंसांचे दर्शन झाले. मागील आठवड्यात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेले रोशन धोत्रे यांनाही चौदा राजहंस दिसल्याची माहिती पक्षीमित्र, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी दिली.सावरगाव येथील तलावावर गेल्या सात ते आठ वर्षांपासून अनेक स्थलांतरित पक्षी येतात. विशेषतः परदेशातून प्रवास करत हे पक्षी येतात. हिमालयातून, तिबेट, कझाकस्तान, रशिया आणि मंगोलियामार्गे राजहंस भारतात येतात. हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबरच्या महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात येतात. मार्चच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस परत जातात. एका दिवसात १६०० किमी उडण्याची क्षमता असलेल्या या राजहंसाच्या कळपाने सावरगावच्या तलावासह संपूर्ण विदर्भातील तलावांमध्ये तळ ठोकला आहे. त्यांना या तलावाचे वातावरण आवडते.
हेही वाचा >>>वाशीम:‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; चालकाला आली डुलकी अन् रुग्णवाहिका ट्रकला धडकली, पाच जखमी
त्यामुळे हे राजहंस दरवर्षी इथे येत असतात. दोन ते तीन किलो वजनाच्या या राजहंसाच्या डोक्यावर आणि मानेवर काळ्या खुणा असतात. त्यांचा रंग फिकट राखडी. त्यांच्या डोक्यावर दोन काळ्या पट्ट्यांसह पांढरा रंग असतो. पाय मजबूत आणि केशरी रंगाचे असतात. त्यांची लांबी ६८ ते ७८ सेमी, पंखांची लांबी १४० ते १६० सेमी आहे. स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाच- सात वर्षापासून या तलावावर रंगीत करकोचा हे एक-दोनच्या संखेत यायचे. त्यानंतर त्यांच्यासोबतच राजहंससारखे इतर विदेशी प्रवासी पक्षी येऊ लागले. पूर्वी ते एक ते दोनच्या संख्येने यायचे. आता त्यांनी त्यांनी संख्या वाढून १३ ते १४ इतकी झाली आहे. मार्च संपत आला तरी हे पक्षी अजूनही परत गेले नाही.