पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ असलेल्या ऐतिहासिक मल्हार गडावर एका जोडप्याला अश्लील चाळे करताना हटकल्याने त्या जोडप्याचा राग अनावर झाला. चिडलेल्या दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, डोक्यात दगड मारून गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारात प्रमोद मोहन जगताप (वय २८ ,रा.जगताप मळा ,आळंदी म्हातोबाची, जिल्हा पुणे) हा दुर्गप्रेमी तरुण जखमी झाला . सासवड येथील एका खाजगी रुग्णालयात त्याचेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

याबाबत सासवड पोलीस ठाण्यात या अनोळखी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.सासवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद जगताप हा दुर्गप्रेमी गडकिल्ले संवर्धनाचे काम करतो .तसेच माऊंटन ट्रेलर रेस करतो. त्यामुळे वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर तो  नेहमी जात असतो. सासवड जवळील मल्हार गडावर तो आठवड्यातून तीन ते चार वेळा येत होता.

शनिवारी (दि .१) तो सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे मल्हार गडावर आला, गडावरील महादेव  व खंडोबा मंदिरात दर्शन करून गड फेरी करीत असताना झेंडेवाडी बाजूकडील बुरुंजाच्या  तटबंदी जवळ एक अनोळखी मुलगा व एक मुलगी अश्लील चाळे करत बसल्याचे त्याला दिसले. त्याने त्यांच्याजवळ जाऊन  दादा ,ताई ही अश्लील चाळे करण्याची जागा नाही, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा गड किल्ला तुझ्या बापाचा आहे का असे विचारून जोडप्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रतिकार करत असताना त्याला खाली पाडले व मुलाने त्या मुलीला डोक्यात दगड मार असे सांगितले .मुलगी डोक्यात दगड मारू लागली त्यावेळी प्रतिकार करून त्यांचे तावडीतून सुटून हा तरुण घाबरून खाली पळत आला.  ते दोघे पळून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या दुचाकीचा प्लग काढून आणला. खाली आल्यावर त्याने त्याच्या मित्राला बोलावून घेतले आणि सासवड पोलीस ठाण्यामध्ये येऊन पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली .ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये त्याला ठेवण्यात आले आहे यावेळी  खिशातील २१०० रुपये या जोडप्याने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून सासवड पोलीस ठाण्यात जखमी प्रमोद जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे.

लवकरच दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊ

सासवड पोलीस ठाण्यात या दोन्ही अनोळखी तरुण-तरुणी विरुद्ध भारतीय न्याय संहिता ,२०२३ चे कलम १०९ , ११९ (१) २९६ , ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे लवकरच दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊ असे सासवड येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader