कराड : अपत्य प्राप्तीचे अमिष दाखवून दाम्पत्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी परजिल्ह्यातील चार जणांची टोळी तळबीड (ता.कराड) पोलिसांनी गजाआड केली आहे. या टोळीने ठिकठिकाणी अनेक दाम्पत्यांना भोंदूगिरीतून मोठ्या प्रमाणात फसवले असल्याचा पोलिसांचा अंदाज असल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काहीजणांचा सहभाग असण्याचीही शक्यता व्यक्त होेत आहे. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांकडून होणाऱ्या लुटीचा गंभीर विषय चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपत्याहिन जोडप्यास अपत्य प्राप्तीचे अमिष दाखवून लाखो रुपयांची औषधे देवून फसवणूक  भोंदुंच्या टोळीविरुध्द काल बुधवारी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार झाली होती. यावर त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, या भामट्यांनी जिल्ह्यात अनेकांना अपत्य प्राप्तीचे अमिष दाखवून फसवल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती अशी की,  तळबीड (ता. कराड) येथील एका दापंत्यास नारायण वाघ वैद्य नावाच्या भोंदु वैधुने कोणतीही वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना एकजण सातारा जिल्हयात कार्यरत असल्याची माहिती पोलिस प्रमुखांना मिळाली. त्यांनी याबाबत  तळबीड पोलिसांना सूचना दिल्या.  त्यानुसार पोलिसांनी एका दांपत्याबरोबर चर्चा केली.

यामध्ये त्यांना नारायण वाघ वैद्य नावाच्या वैद्याने २१ जुलै २०२३ रोजी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या औषधाने अपत्य होवू शकते. ते औषध मोफत देतात. फक्त आमच्या मठाची ११ हजार रुपयांची पावती घ्यावी लागेल, असे सांगून, दांपत्याचा विश्वास संपादन केला. तसेच त्याचदिवशी चारजण टाटापंच मोटारकारने येवून त्या दांपत्यास अपत्याबाबत औषध देतो. परंतू, ती औषधे महाग आहेत. तुमची तुम्ही आणा, असे सांगून त्यानंतर वेळोवेळी त्यांना त्यांच्या जवळची व सातारा येथील शाही एजन्सी आयुर्वेदीक मेडीकलमधून एक लाख ७६ हजार ५०० रुपयांची औषधे दिली. त्यानंतर १४ ऑगस्टला परत तळबीड येथे येवून त्या दांपत्याची मेडीकलमधील किटने टेस्ट करुन सदर महिला गरोदर असल्याचे सांगितले. त्यांनी सदरची टेस्ट कोणत्याही डॉक्टरकडून करु घेवून नये. नाहीतर ती टेस्ट निगेटीव्ह येईल, असे सांगून त्यांना २ लाख ६० हजार रुपयांची औषधे घेण्यास सांगितले. तेव्हा या दापत्यास त्याचा संशय आल्याने त्यांनी औषधासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.

पैसे जमले की सांगतो, असे सांगून त्यांना पाठवून दिले. नंतर ती टोळी त्यांना औषध घेण्याकरीता वारंवार संपर्क करीत होती. म्हणून त्यांनी कराडमधील एका डॉक्टरकडे नियनीत टेस्ट केली. तेव्हा त्यांना संबंधित महिला गरोदर नसल्याचे समजले. सदर महिलेने सोनाग्राफी केली असता ती गरोदर नसल्याचे समजल्याने त्यांना  धक्काच बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या टोळीविरुध्द काल बुधवारी (दि. १६)  तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचदिवशी सदर टोळीचे लोक पुन्हा तळबीड येथे आले असल्याचे माहिती दांपत्याने पोलिसांना दिली. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या टोळीला ताब्यात घेतले.

पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता टोळीप्रमुखाने आपले नाव नारायण वाघ वैद्य असल्याचे सांगितले. पण, अधिक चौकशीत त्याचे खरे नाव राहुल धरम गिरीगोसावी (३२, रा. तिरंगानगर साक्री, ता. साक्री जि. धुळे) , त्याचे साथीदार अश्विन अशोक गोसावी (३४ रा. गोसावीवस्ती वैद्यवाडी, हडपसर-पुणे, मुळ रा. वाकोत, ता. जामनेर जि. जळगाव), शैलेश सुरेश गोसावी (२२, रा. तिरंगानगर साक्री, ता. साक्री जि. धुळे), दैवेद्र ज्ञानेश्वर पवार (३२ व्यवसाय रा. सुशिलानगर साक्री, ता. साक्री जि. धुळे) अशी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांनी सातारा जिल्हयात अनेकांना अशा प्रकारे संपर्क साधून त्यांच्याकडूनही अशाच प्रकारे पैसे उकळल्याची, भोंदूगिरीतून फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. या टोळीविरुध्द तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल वरोटे तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A gang of four arrested the lure of childbearing talbid ysh