आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणाचे संरक्षण करून यशस्वी कसा करता येईल, असा सर्वाचा प्रयत्न आहे. नाशिक शहराला चांगल्या संकल्पनांचे शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळा हरित कुंभ करण्यास आपण सर्व कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केले. येथील महात्मा फुले कला दालनात शनिवारी हरित कुंभ समन्वय कार्यालयाचे उद्घाटन डवले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, जिल्हाधिकारी विलास पाटील, संविदानंद सरस्वती, अभिनेता चिन्मय उदगीरकर, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील उपस्थित होते. गोदावरी प्रदूषणाच्या विषयावर उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. जल प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. कुंभमेळ्याशी संबंधित विविध घटकांचा त्यात समावेश असावा ही बाब पुढे आली आणि त्यातून हरित कुंभची संकल्पना मांडण्यात आल्याचे डवले यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांची बैठक आयोजित करून कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेच्या समन्वयाने हाती घेण्यात आले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हरित कुंभ म्हणून पार पाडण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, साधू-महंत असे सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. हा उपक्रम यशस्वी करून नाशिकच्या नावलौकिकात निश्चितपणे भर पडेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. या वेळी हरित कुंभ २०१५-१६च्या बोधचिन्हाचे अनावरण व कृती आराखडय़ाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिकेचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी केले तर आभार राजेश पंडित यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा