तेराव्या शतकापासुन सुरु असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानच्या दसरा मेळाव्यात घोडेशर्यत ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानाच्या याच दसरा मेळाव्यातील घोडेशर्यती दरम्यान काळजाचा ठोका चुकवणारी एक दुर्घटना घडली आहे. शर्यतीदरम्यान रस्त्यावर आलेल्या काही तरुणांना वेगात धावणाऱ्या घोड्याने धडक दिली. यामध्ये एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानचा आदिवासी दसरा महोत्सव विधीवत पुजेसह संपन्न झाला. या ठिकाणी होणारी घोड्यांची शर्यत आणि रावणपूजन खऱ्या अर्थाने आकर्षणाचा विषय असतो. करोनाच्या दोन वर्ष कालखंडानंतर यंदा घोडे शर्यतीत विशेष उत्साह दिसून आला.
घोडे शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी जवळपास २५ हजारांहून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र घोडेशर्यती दरम्यान घोड्यांच्या रेस ट्रॅकवर काही तरुण वाद घालत उभे होते. याचवेळी शर्यतीतील घोडे याठिकाणी दाखल झाले. यातील एका घोड्याने तरुणांना जोरदार धडक झाली. काळजाचा ठरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक तरुण किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.