सोलापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना अक्कलकोट तालुक्यात तिघा संशयितांकडून तलवारी आणि कोयत्यांचा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे ही कारवाई करण्यात आली.

जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यांमध्ये २९ तलवारी आणि तीन कोयत्यांचा समावेश आहे. बबलिंग पंचाक्षरी बमगोडा याच्या घरात तलवारींचा अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जेऊर येथे त्याच्या घराची झडती घेतली असता, ३० ते ३५ इंच लांबीचे पाते असलेल्या २० तलवारी सापडल्या. त्याची कसून चौकशी केली असता लक्ष्मीकांत काशीनाथ कोळी (रा. चिंचपूर, ता. अक्कलकोट) आणि सुनील बसप्पा कुंभार (रा. तडवळ, ता. अक्कलकोट) या त्याच्या अन्य दोन साथीदारांकडेही शस्त्रांचा साठा असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार कोळी याच्या घरातून पाच तलवारी आणि दोन कोयते हस्तगत करण्यात आले, तर सुनील कुंभार यांच्या ताब्यातून चार तलवारी आणि एक कोयता जप्त करण्यात आला. तिघा जणांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा अधिनियमाखाली अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रसाठे असणाऱ्या भागात बातमीदार नेमून कारवाईबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी नेहमीच संवेदनशील मानला जातो. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून रक्तरंजित राजकारण केले जाते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या तालुक्यात मोठा शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे स्थानिक राजकारणातील गुन्हेगारीला काही प्रमाणात धक्का बसला आहे.