पुण्यात आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे. कोंबड्यांच्या खुराड्यात घुसलेल्या बिबट्याला अथक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. ओतूरच्या आईनेवाडी गावात हा बिबट्या घुसला होता. ही मगंळवारची घटना आहे. बिबट्याला पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वनविभागाने डार्क मारत बिबट्याला बेशुद्द करत जेरबंद केलं.
बिबट्या ज्या खुराड्यात घुसला होता तो किरण अहिनवे यांच्या मालकीचा आहे. विशेष म्हणजे जाळी असतानाही बिबट्याने खुराड्यात प्रवेश केला होता. बिबट्या आतमध्ये असल्याने कोंबड्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. बिबट्या कोंबड्यांना फस्त करण्याचीही भीती होती. अखेर वनविभागाला गावात बिबट्या घुसला असल्याची माहिती कळवण्यात आली.
#VIDEO– पुणे: कोंबड्यांच्या खुराड्यात घुसला बिबट्या अन्…https://t.co/t5FCIv2nrh < येथे वाचा सविस्तर वृत्त#Pune pic.twitter.com/3QgVcFKpJr
— LoksattaLive (@LoksattaLive) December 19, 2018
वनविभागाने जुन्नर बिबट निवारा केंद्राला पाचारण केलं. तोपर्यंत ही माहिती संपूर्ण गावात पसरली आणि ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. कोंबड्यांचा जीव वाचवणं आणि बिबट्याला सुखरूप तेदेखील जागीच पकडण्याचं आव्हान रेस्क्यू टीमसमोर होतं. जागा छोटी असल्याने बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्क मारणं अडचणीचं झालं होतं. नेम चुकला तर बिबट्या चवताळण्याची शक्यता होती. शेवटी अचूक नेम साधत बिबट्याला डार्क मारण्यात आला. मग बेशुद्ध झालेल्या बिबट्याला जेरबंद केल्याचं पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. जुन्नर बिबट निवारा केंद्रात बिबट्याची रवानगी करण्यात आली आहे.