ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सहा वेळा धमकीपत्रे पाठवणाऱ्या नेवासे येथील ज्ञानेश मोहनीराज पानसरे (४३, रा. नेवासे) या लॉजमालकाला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याने गुन्ह्य़ाची कबुलीही दिली आहे. गुंडांकडून व्यवसायास होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी या गुंडांच्या नावाने त्याने हजारे यांना ही धमकीपत्रे पाठवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी शनिवारी ही माहिती दिली. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. रामसामी व पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपस्थित होते. ज्ञानेश पानसरे याचे नेवासे येथे बाजारतळावर ‘समाधान’ नावाचे लॉज आहे. ज्ञानेश याचा कोणत्याही संघटनेशी किंवा राजकीय पक्षाशी काही संबंध नाही. हजारे यांना आतापर्यंत किमान १३ वेळा धमक्या मिळाल्या आहेत. त्यातील १ जुलै २०१५, २३ सप्टेंबर २०१५, १२ जानेवारी २०१६, ९ मार्च २०१६ व १४ मे २०१६ अशी सहा पत्रे नेवासे टपाल कार्यालयामार्फत पाठवली गेली होती. ती पानसरे यानेच पाठवल्याची कबुली दिली आहे. याशिवाय पानसरे याने शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी बल्लाळ यांनाही धमकीपत्र पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व धमकीपत्रांवर नेवासे येथील कुख्यात गुंड अण्णा लष्करे, त्याचा भाऊ अंबादास लष्करे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. अंबादास लष्करे हा शिवसेनेचा माजी शहरप्रमुख आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिकांत पाटोळे, पारनेरचे निरीक्षक पारेकर, सहायक निरीक्षक जाधव व नेवासे येथील सहायक निरीक्षक शरद गोर्डे यांच्याकडे या धमकीपत्रांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हजारे यांना मिळालेल्या धमकी पत्रासंदर्भात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता, त्याचा तपास न्यायालयाची परवानगी घेऊन करण्यात आला, आता या गुन्ह्य़ात खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले. हजारे यांची सुरक्षा व्यवस्थाही कायम ठेवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

धमकीपत्रांचा आनंद लुटला!
‘अण्णा हजारे यांना पत्र पाठवल्यानंतर पोलिसांची उडणारी धावपळ, माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, हे आपल्यामुळे घडते याचा आनंद मिळत होता,’ असे आरोपी पानसरे याने पोलिसांना सांगितले. शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी सीईओ बल्लाळ व हजारे यांच्या धमकीपत्रातील हस्ताक्षर जुळल्याने, त्यामागे एकच व्यक्ती असावी, असा पोलिसांना संशय बळावला. पथकाला एके दिवशी लॉजमधील रजिस्टर उपलब्ध झाले, त्यातील हस्ताक्षर व धमकीपत्रातील हस्ताक्षर जुळल्याने हा उलगडा झाला. आता ही पत्रे व पानसरेचे हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवली आहेत.