मिरजेतील खराब रस्त्याचा आणि कार्यसम्राट म्हणवून घेणार्या लोकप्रतिनिधींचा पंचनामा कतारमध्ये चालू असलेल्या विश्वचषक फुटबॉल सामन्यावेळी प्रेक्षागारातून करण्यात आला. याची चित्रफित गुरूवारी समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने शहरातील रस्त्याची आणि यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झालेला निधी कुठे मुरला याचीही चर्चा सुरू झाली.
हेही वाचा- कर्नाटकचा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न; जतच्या दुष्काळी भागात तलावात सोडले पाणी
मिरज शहरातून जाणारा मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज रस्ता गेली अनेक वर्षे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग यांच्यातील वादामुळे दुरूस्ती अभावी तसाच आहे. या रस्त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणाही केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी करीत आभासी उद्घाटनही केले. मात्र केवळ रस्त्यावर मुरूमाची पसरणी केल्याने या रस्त्याची दुरावस्था अधिकच भयावह झाली आहे. शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या डॉयटरांनीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
मात्र, आता एका फुटबॉलप्रेमी इम्पियाज पैलवान या युवकांने या रस्त्याची अवस्था दर्शवणारे फलक चक्क कतारमध्ये विश्वचषक फूटबॉल स्पर्धेदरम्यान झळकावून शहरातील रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. या फलकावर कार्यसम्राट लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देत असताना जवळच इस्पितळ दर्शवून योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.