पबजी ऑनलाइन गेमचं वेड दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशाच पद्धतीने पबजी गेमच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने गेम खेळताना झालेल्या भांडणातून बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकलं असल्याची घटना समोर आली आहे. 7 फेब्रुवारीला कल्याणमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाइलवर पबजी गेम खेळत असताना त्याच्या मोबाइलची बॅटरी संपली. मोबाइल चार्ज करण्यासाठी चार्जर घेतला असता त्याची वायर कापली गेली असल्याचं दिसलं. आपल्या बहिणीनेच वायर कापली असावी असा संशय आल्याने आरोपीने तिच्यासोबत भांडण्यास सुरुवात केली. बहिण नकार देत असतानाही आरोपी मात्र तिच्यावर राग व्यक्त करत होता.

भांडणात बहिणीचा होणारा नवरा ओम भावदनकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी रजनीश याने त्याच्यावर चाकूने हल्ला करत जखमी केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीश याने रागाने आधी बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापली. जेव्हा ओम याने मध्यस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा रजनीश याने चाकूने त्याच्या पोटावर वार केला.

ओम याला कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहुराव साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man stab sisters fiance after dispute over pubg game