करोनामुळे पसरलेल्या अवास्तव धास्तीमुळे निगेटिव्ह असलेल्या जन्मदात्या पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. त्यामुळे मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. जन्मदात्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ असल्याचे मुलाने लिहून दिल्यामुळे बेवारस अशी नोंद घेत उस्मानाबाद नगरपालिकेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यामुळे सोमवारी मयत झालेल्या परंडा तालुक्यातील उकडगाव येथील मयतावर बुधवारी कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दमा आणि अन्य आजारामुळे दवाखान्यात दाखल असलेल्या भागवत किसन पवार यांना पाच दिवसांपूर्वीच करोनाची बाधा नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. मात्र, अन्य आजारामुळे उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. करोनाची बाधा नसतानाही मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. अन्य नातेवाइकांनीही जबाबदारी घेण्यापासून पळ काढला. चक्क दोन दिवस अंत्यविधीविना मृतदेह रुग्णालयात पडून होता. त्यांच्या पत्नीवर परंडा उपजिल्हा रुग्णालयातील करोना कक्षात सध्या उपचार सुरू आहेत. दोन दिवस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच पुढे न आल्यामुळे पोलीस पंचनामा करून बेवारस अशी नोंद घेण्यात आली.

परंडा येथील उकडगाव येथील एका महिलेला करोनाची लागण झाली. तपासणीअंती तिचा अहवाल सकारात्मक असल्याचे समोर आले. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. तिच्या पतीचा अहवाल मात्र नकारात्मक आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, अन्य आजारांमुळे त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. करोनाचा नसलेल्या पवार यांचा अन्य आजारामुळे सोमवारी मृत्यू झाला. मात्र, करोनाच्या अवास्तव भीतीपोटी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक तसेच कुटुंबातील सदस्यांनी चक्क नकार दिला. पोटच्या मुलानेच मृतदेह स्वीकारण्यास असमर्थता दाखविल्याने मृतदेह सलग दोन दिवस जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. बुधवारी दुपारी कायदेशीर सोपस्कार पार पाडत उस्मानाबाद पालिकेच्यावतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास आपण असमर्थ असल्याचे लेखी निवेदन मुलाने परंडा पोलीस ठाण्यात दिले असल्याची माहिती आहे. त्यानुसार परंडा पोलिसांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदरील माहिती दिली. त्यामाहितीच्या आधारे पोलीस पंचनामा करून सर्व कायदेशीरबाबी पार पाडण्यात आल्या. त्यानंतर उस्मानाबाद नगरपालिकेने चार कामगारांच्या मदतीने पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A mans corona test became negative but his dead body was rejected by the his son municipal corporation done funeral aau