कोल्हापूर : इचलकरंजी शहरासाठी राबवल्या जाणाऱ्या दूधगंगा नळपाणी योजने विरोधात दूधगंगा नदीकाठच्या ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी सुळकुड गावच्या योजनेतून पाणी देण्याला विरोध ग्रामीण भागाचा विरोध राहणार आहे. जबरदस्तीने योजना राबवल्यास ती फोडून काढू, असा इशारा दिला. साडेतीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून नळ पाणी योजना राबवली जाणार असून त्यासाठी शासनाने नुकताच निधीही मंजूर केला आहे. ही योजना राबवण्याची तयारी इचलकरंजी मध्ये सुरू असताना त्याला कागल व शिरोळ तसेच कर्नाटकातील काही गावांनी विरोध दर्शवला आहे.
दूधगंगा बचाव कृती समितीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ग्रामस्थ, शेतकरी यांनी आज कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे ठिय्या मारून ग्रामस्थांनी पाणी देणार नाही, पाणी आमच्या हक्काचे अशा घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले.
कृष्णा,पंचगंगा योजना वापरा
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी , पाणी पिण्याचे पाणी सर्वांना मिळायला हवे. मात्र इचलकरंजी महापालिकेने गावातील दूषित पंचगंगा स्वच्छ करून चांगले सांडपाणी प्रकल्प राबवून ते पाणी वापरण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला दिला. दत्तवाड येथील भवानीसिंह घोरपडे म्हणाले, ग्रामीण भागाला बारमाही पाणी मिळाले पाहिजे. इचलकरंजीचा विस्तार होणार असल्याने त्यांना अधिक पाणी लागणार आहे. त्यांनी कृष्णा नळ पाणी योजना सक्षम करून त्याचे पाणी वापरावे.