सोलापूर : समाज माध्यमावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणे, कथित लव्ह जिहादच्या नावाखाली किंवा गोहत्येच्या संशयावरून झुंडीने हल्ले करणे, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण करणे यासारखे प्रकार सोलापुरात वाढले असताना त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. दोघेही विवाहीत असलेल्या आणि एका हाॕटेलात जेवण करण्यासाठी एकत्र आलेल्या भिन्नधर्मांच्या प्रेमीयुगुलाला तरूणांच्या जमावाने पकडले. यात तरूणाला बेदम मारहाण करून दुसरीकडे पळवून नेत पुन्हा मारहाण करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. झुंडीच्या हल्ल्यातून तरूणाला वाचविणा-या काही कार्यकर्त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली असता पोलिसांनी दाद न देता उलट त्या कार्यकर्त्यांनाच उद्देशून जातीवाचक भाषा केल्याची तक्रार संबंधित कार्यकर्त्यांच्या संघटनेने पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडे केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात एकाच गावात राहणारे आणि विवाहीत असलेले भिन्नधर्मीय प्रेमीयुगुल सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील एका हाॕटेलात जेवण करण्यासाठी आले होते. तेव्हा अचानकपणे धुडघूस घालत तरूणांची झुंड तेथे आली आणि ,उन्मादाच्या घोषणा देत, संबंधित प्रियकर तरूणाला बेदम मारहाण करायला सुरूवात केली. नंतर त्या तरूणाला हाॕटेलातून बाहेर काढत पुणे रस्त्यावर बाळेनजीक पुलाखाली पळवून नेऊन पुन्हा बेदम मारहाण केली गेली. सुदैवाने तेथून जाणा-या मातंग समाजाच्या काही समंजस कार्यकर्त्यांनी त्या तरूणाची हल्ल्यातून कशीबशी सुटका केली. त्यास फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले असता तेथील पोलिसांनी चौकशीत जखमी तरूणाची दखल घेतली तर नाहीच, उलट त्याला वाचविणा-या कार्यकर्त्यांनाच अवमानकारक, जातीवाचक भाषा वापरून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी जखमी तरूणाला त्याच्या गावी परत पाठविल्यानंतर इकडे या प्रकरणाला दुसरेच वळण लागल्याचे दिसून आले. जातिवाचक भाषा वापरून पोलिसांनी हीन वागणूक दिल्याची तक्रार संबंधित कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडे केली आहे. दरम्यान, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनीसंबंधित जखमी तरूणाने फिर्याद देण्यास नकार दिल्यामुळे त्यास परत पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
तथापि, या प्रकरणात उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी, पोलिसांवर बेजबाबदार आणि अन्यायी वर्तनाचा आरोप केला आहे. झुंडीने ज्या तरूणाला कथित लव्ह जिहादच्या नावाखाली बेदम मारहाण केली, त्याची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करायला हवे होते. परंतु जखमी तरूणाला फिर्याद देण्यास बाध्य करून परत पाठवून उलट त्यास झुंडीच्या हल्ल्यापासून वाचविणा-या मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी जातीवाचक भाषा वापरून मारहाण केली. यात फिर्याद नोंदवून न घेता तक्रार द्या, चौकशी करून कारवाई करू, असे पोलीस सांगतात. म्हणजे मूळ जखमी तरूणावरील हल्ल्याचा गुन्हा पोलिसांनी दडपताना, जखमी तरूणाला वाचविणा-या कार्यकर्त्याला मारहाण केली, हा प्रकार संतापजनक आहे. संबंधित दोषी पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खंदारे यांनी दिला आहे.