“कानपूरमध्ये जी घटना घडली आहे, त्याबद्दल दुर्दैवाने सांगावं लागतय की टीव्ही मीडियामध्ये केवळ एकतर्फी व्हिडिओ दाखवले जाताय. दगडफेक दोन्ही बाजूने झाली आहे.” असं एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज लातूर येथे पत्रकारपरिषदेत बोलताना म्हटलं आहे.

तसेच, “जेव्हा वेब न्यूज पोर्टलचे लोक दोन्ही बाजू दाखवत होते. तेव्हा उत्तर प्रदेशच्या सरकारने त्या लोकांवर गुन्हे दाखल केले की तुम्ही वातावरण खराब करण्यासाठी व्हिडिओ दाखवले. आता जर वेब न्यूज पोर्टलचं काम सत्य दाखवणं आहे, ते कोणचाही बाजू घेत नव्हते. उत्तर सरकारने त्यांच्यावर यासाठी गुन्हे दाखल केले कारण की, दोन्ही बाजूने दगडफेक झाली हे दाखवलं जाऊ नये. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली मात्र एका बाजूच्या लोकांची अटक होतेय, जे की नेहमीच होतं. त्यांची घरं तोडली जातील अशी धमकी दिली जाते.” असा देखील यावेळी ओवेसींनी आरोप केला.

याचबरोबर “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना ओवेसींनी म्हटले की, मागील विधानसभा निवडणुकीत हेच काँग्रेस, राष्ट्रवादी विशेषकरून मुस्लीम आणि दलित समाजात जाऊन हा संदेश देत होते, की एमआयएम आणि ओवेसींना मत देऊ नका. कारण, आपल्याला भाजपा आणि शिवसेनेला रोखायचं आहे आणि आता हेच लोक एकत्र येत आहेत.”

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर कानपूरमध्ये दंगल उसळल्याचे दिसून आले. शहरातील नई सडक आणि यतीमखाना भागात दुकानदारांना शटर खाली करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर दोन गटांत वादाला सुरुवात झाली आणि दंगल उसळली.