कराड : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ खाजगी आराम बसला काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत ही आराम बस जळून खाक झाली तर लाखो रुपयांचे नुकसान होताना दुसरीकडे मात्र सुदैवाने आराम बसमधील सर्व ५५ प्रवासी बचावले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की डॉल्फिन कंपनीची आराम बस (क्रमांक एमएच ०३, पी.सी. ४५००) ही सुमारे ५५ प्रवाश्यांना घेवून मिरजेहून मुंबईकडे निघालेली असताना (तासवडे ता. कराड) गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. त्यात या बसला पाठीमागून आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.
बसला आग लागल्याचे पाहून महामार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनातील लोकांनी ही माहिती तासवडे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना दिली. लगेचच टोलनाका व्यवस्थापनाने मदतीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. महामार्ग व्यवस्थापनाचे गस्त घालणारे पथक, तळबीड पोलीस हेही दाखल झाले. सर्व प्रवाश्यांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले होते. प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
दरम्यान, नजीकच्या आग्निशामक दलाशी संपर्क झाल्याने पाणी बंब व आग्निशामक पथकही दाखल झाले. त्यांनी ही आग बसच्या डिझेल टाकीपर्यंत पोहचू दिली नाही. त्यामुळे या टाकीचा स्फोट झाला नाही आणि सुदैवाने आणखी हानी टळली. वाहनाचे लाखोंचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु, प्रवाशांचे काय आणि रक्कमेचे नुकसान झाले हे पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.