सांगली महापालिकेला माझी वसुंधरा उपक्रमातील राज्य शासनाचे सात कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सभागृह नेत्या भारती दिगडे व उपमहापौर उमेश पाटील उपस्थित होते.
हेही वाचा- कर्नाटकमधील संघटनांकडून सीमेवर पुन्हा राडा, महाराष्ट्राच्या गाड्यांना फासळं काळं!
महापौर सुर्यवंशी यांनी सांगितले, माझी वसुंधरा अभियान २ अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . या स्पर्धेमध्ये राज्यातील ४०६ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सहभाग घेतला होता. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अमृत गटात महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला होता मात्र याबाबतच्या बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आलेली नव्हती. याबाबत शासनाकडून आलेल्या परिपत्रकामध्ये माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल महानगरपालिकेला अमृत गटासाठी ७ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच या बक्षीस रकमेमधून मनपा क्षेत्रात निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, त्याचबरोबर मनपा क्षेत्रात मियावाकी वृक्षारोपण, अमृतवने, स्मृतीवने , शहरी वने बटरफ्लाय गार्डन, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल, रोपवाटिकांची निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत असेही महापौर श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले.