सांगली : घार उंच आकाशी असली तरी तिचे लक्ष पिलापाशीच असते. मात्र, घरटेच कमकुवत झाल्याने पिलू जमिनीवर आले. जमिनीवरच्या पिलाची आणि मादी घारीची पुनर्भेट घडवून आणण्याची जटिल कामगिरी सांगलीतील पक्षी मित्रांनी पार पाडली. मंगळवारी सांगलीतील एसटी कॉलनीमध्ये श्री. पतंगे यांच्या अंगणात पाखराचे एक पिलू जमिनीवर पडल्याचे आढळून आले.
पिलू नेमके कोणत्या पक्षाचे आहे हेच कळत नव्हते. पतंगे यांनी पक्षी मित्र श्री. मेहत्रस व मानद वन्य जीव संरक्षक अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाहणी करून हे पिलू घारीचेच असल्याचा निष्कर्ष काढला. या दरम्यान, उंच वाढलेल्या नारळाच्या झाडाभोवती घारीच्या घिरट्या सुरू होत्या. नारळाच्या झाडावर असलेल्या घरट्यात मादी इतर पिलांसोबत असल्याचे आढळले.
एक पिलू तिच्यासोबत तर दुसरे माणसाच्या गराड्यात अडकलेले. मादी घार उंच आकाशी झेप घ्यायची आणि काही क्षणात परत घरट्याकडे परत यायची, असे बराच काळ सुरू होते. तरीही पक्षीप्रेमींनी धाडस करून उंच झाडावर चढून पाहिले असता घरटे नाजूक झाल्याने पिलू जमिनीवर पडल्याचे दिसून आले. पक्षी मित्रांनी जमिनीवर पडलेले पिलू परत घरट्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन्ही पिले व्यवस्थित राहू शकतील एवढे घरटे मजबूत नव्हते. यावर पर्याय म्हणून बांबूच्या टोपलीत पिले ठेवण्याचा आणि आहे त्याच जागी टोपली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, उंच नारळाच्या झाडावर चढून पिले सुरक्षित पोहच करणे आणि हे करत असताना घारीकडून हल्ल्याची भीती होतीच. शहरातील उंच झाडावर चढण्याची सवय असलेल्या श्री. बंडगर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी हेल्मेट घालून ही किमया साधली आणि तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मादी घारीची आपल्या दोन पिलांशी पुनर्भेट झाली.
यावेळी खोपा बर्डचे सचिन शिनगारे, ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ, बर्ड साँग संस्थेचे सदस्य श्री. पाटील व मेहत्रस आदींनी आई व पिलाची पुनर्भेट घडवून आणण्यात मोलाची कामगिरी केली.