सांगली : महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावणारी प्रतिक्षा बागडी सांगली जिल्ह्याच्या अभिमानाचे प्रतिक आहे. तिच्या या यशाने सांगलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे मत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. प्रतिक्षाला एक लाखाचे बक्षिस जाहीर करीत तुंग येथे आधुनिक कुस्ती केंद्र उभारले जाईल असेही मंत्री खाडे म्हणाले.
मिरजेत भाजपा कार्यालयात पहिली महाराष्ट्र केसरी पै. प्रतिक्षा बागडी हिचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पै. प्रतीक्षा हिने मिळवलेले यश तिच्या जिद्दीचे व कष्टाचे प्रतीक आहे. सांगलीत झालेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ४०० हुन अधिक महिला पैलवान सहभागी झाल्या होत्या. यासर्वांमध्ये उत्तुंग कामगीरी करीत जेतेपदाला गवसणी घालणे ही सोपी गोष्ट नव्हती. तिच्या या यशाने आजच्या तरुणाई समोर एक आदर्श उभा राहिला आहे. यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे, प्रतिक्षाचे वडील रामदास बागडी, बाबासाहेब आळतेकर तसेच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.