अमरावतीतल्या डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णामध्ये तुफान हाणामारी झाली. डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याचा आरोप या रुग्णाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास हा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुठलेही उपचार झाले नसल्याचा आरोप आहे. त्यातून ही मारहाण झाली आहे. माझ्यावर उपचार तर सोडाच साधं औषधही कुणी दिलं नाही असंही या रुग्णाने म्हटलं आहे.
डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांनी काय आरोप केला?
डॉक्टरने रुग्णावर कुठलेही उपचार केले नाहीत. तसंच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याला कुठलंही औषध दिलं नाही असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनीही केला आहे. हे असं का घडतं आहे याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये आणि डॉक्टरमध्ये राडा झाला. त्यानंतर या राड्याचं रुपांतर हाणामारीत झाला. रात्री रुग्णालयात तणावाचं वातावरण होतं. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर विरोधात गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
रुग्णाने या सगळ्या प्रकाराविषयी काय म्हटलं आहे?
मी एकेठिकाणी काम करत असता खाली पडलो. त्यानंतर मी पंजाबराव रुग्णालयात सकाळी दहाच्या दरम्यान आलो त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत मला असंच या वॉर्डात जा त्या वॉर्डात जा म्हणून फिरवण्यात आलं. ही चिठ्ठी इकडे दे, तिकडे दे असं सांगण्यात आलं. ३ च्या नंतर माझा एक्स रे काढला, त्यानंतर हाताला आणि पायाला प्लास्टर केलं गेलं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत औषध दिलंच नाही. सिटी स्कॅनही दोनदा करावं लागलं. माझ्या घरातल्यांनी विचारलं की तुम्ही रुग्णाला गोळ्या का देत नाही? तेव्हा त्यांनी लक्ष दिलं नाही तसंच सगळ्या डॉक्टरांनी एकत्र येत आम्हाला मारायला सुरुवात केली. आम्हाला मारत गेटपर्यंत नेलं असा आरोप या रुग्णाने केला आहे. या प्रकरणात भीम आर्मीनेही रुग्णालय प्रशासनावर आरोप केले आहेत. तसंच रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचंही म्हटलं आहे. या प्रकरणी रुग्णालयाचं म्हणणं काय? ते समोर आलेलं नाही.