गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपा किंवा भाजपासमर्थक पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही अनेक नेते काँग्रेसला रामराम ठोकून महायुतीत सामील झाले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी आज एका नेत्याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता सोनिया गांधी यांच्याकडे रडला होता, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो न्याय यात्रेचा सांगता सोहळा आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून जनतेशी संवाद साधला.
राहुल गांधी म्हणाले, “एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मी नाव घेऊ इच्छित नाही. पण ते रडत माझ्याकडे आईकडे आले. आईकडे येऊन म्हणाले, सोनियाजी मला लाज वाटतेय. या लोकांविरोधात, या शक्तीविरोधात लढण्याची हिंमत माझ्याकडे नाही. मी तुरुंगात जाऊ इच्छित नाही.”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “हे एकमेव नेते नाहीत. असे हजारो लोक आहेत. ज्यांना घाबरवलं गेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही असेच गेले. मी ज्या शक्तीबद्दल बोलत आहे, त्या शक्तीने या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपात पाठवलं आहे. त्यामुळे हे सर्व घाबरून गेले आहेत.” हा प्रसंग सांगता राहुल गांधी यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या नेत्याबाबत त्यांनी भाष्य केलं हे गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा >> “आम्ही मोदी किंवा भाजपाविरोधी नाही, आम्ही तर…”, शिवाजी पार्कातून राहुल गांधींची टीका
“आम्ही सर्व मोदींविरोधात लढत आहोत, असं म्हटलं जातंय. पण आम्ही एकाही व्यक्तीच्या विरोधात लढत नाहीत. आम्ही भाजपा किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाहीत. परंतु, एका व्यक्तीचा चेहरा तयार करून ठेवला आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द आहे. आम्ही या शक्तीविरोधात लढत आहोत, असं राहुल गांधी म्हणाले.
नेत्यांना घाबरवलं गेलं आहे
“आता प्रश्न निर्माण होतो की ती शक्ती कोणती आहे? राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, हे खरं आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, हिंदुस्तानच्या प्रत्येक संस्थेत आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागात आहे. तसंच, मोदी फक्त एक मुखवटा आहे. त्यांना बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणे रोल दिले गेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.