नांदेड पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलचे पिस्तूल गहाळ झाले होते.. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर हे पिस्तूल सापडले ते हिंगोली जिल्ह्यातील वारंगाफाटा कला केंद्रात. या कला केंद्रातील नाच-गाण्याच्या कार्यक्रमाची मजा लुटण्यासाठी नांदेड पोलीस ठाण्यातील काही पोलीस गेले होते. तिथे झालेल्या हाणामारीतच हे पिस्तूल गहाळ झाले. मात्र या प्रकरणाने नांदेड पोलिसांची अंब्रू वेशीवर टांगली गेली. त्यामुळे या प्रकरणास कारण ठरलेल्या या पोलीस कॉन्स्टेबलला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
बंडू कलंदर असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून तो नांदेडच्या पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे पिस्तूल १० डिसेंबर रोजी हरविले होते. दोन दिवस शोधाशोध केल्यानंतरही ते सापडले नव्हते. अखेर ते हिंगोली पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती नांदेड पोलिसांना समजली होती. पिस्तूल ताब्यात घेण्यासाठी नांदेडचे पोलीस हिंगोलीला गेले असता हा प्रकार उजेडात आला.
वारंगाफाटा कला केंद्रावर नाचगाणे व लावणीचा आनंद लुटण्यास अनेक वजनदार मंडळी हजेरी लावतात. १० डिसेंबरला या केंद्रावर काही मंडळी मौज लुटण्यास आली असता तिथे दोन गटांत वाद निर्माण झाला. वाद घालणाऱ्यांत नांदेडचे पोलीसही होते. सुरुवातीला शाब्दिक चकमक होऊन वाद विकोपाला गेला. त्यामुळे केंद्रावरील एकाने आखाडा बाळापूर पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच तेथील सर्वाची पळापळ झाली, पण पोलिसांना तिथे एक पिस्तूल सापडले. पिस्तुलाबाबत त्यांनी दोन दिवस गुप्तता पाळली, मात्र या दोन दिवसांत त्यांनी पिस्तूल मालकाचा शोध सुरू केला. नांदेड पोलीसही गहाळ पिस्तुलाचा शोध घेत होते. हे पिस्तूल हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे असल्याचे लक्षात आल्यानंतर ते तिथे पोहोचले आणि या प्रकाराला तोंड फुटले. वारंगाफाटा हे ठिकाण आखाडा बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने नांदेडचे पोलिसांचे तिथे जाण्याचे प्रयोजन काय, कला केंद्रावरील झटापट नेमकी कशामुळे झाली, हे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहे.
एका पोलिसाच्या गहाळ पिस्तुलाची गोष्ट
नांदेड पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलचे पिस्तूल गहाळ झाले होते.. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर हे पिस्तूल सापडले ते हिंगोली जिल्ह्यातील वारंगाफाटा कला केंद्रात.
First published on: 15-12-2014 at 02:10 IST
TOPICSरिव्हॉल्व्हर
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A story of a missing revolver of a cop