करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या संपूर्ण जग कासवाच्या गतीने चालत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी डिजीटल माध्यमाद्वारे मुलांचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. एकीकडे डिजीटल इंडिया बनण्याच्या दिशेने देश वाटचाल करत असताना, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुरेशा सोयी-सुविधांअभावी शिक्षणाला मुकत आहेत. परंतू हाडाचा शिक्षक या सर्व गोष्टींवर मात करुन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुरुच ठेवतो. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावातील के.पी.गायकवाड माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या मयुर दंतकाळे या शिक्षकाने गावातील मंदीर आणि मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना पाढे आणि कविता शिकवण्याचा उपक्रम हाती घेत, मुलांच्या अभ्यासात खंड पडणार नाही याची काळजी घेतली आहे. या विशेष उपक्रमाबद्दल लोकसत्ता ऑनलाईनने दंतकाळे यांच्याशी संवाद साधला.
करोना प्रादुर्भावामुळे राज्यात अद्याप शाळा बंद आहेत. शहरातील पालक आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप, स्मार्टफोन अशा सोयी उपलब्ध करुन देतात. परंतू ग्रामीण भागात आर्थिक परिस्तिती बेताची असलेल्या पालकांना या काळात अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. चित्रकला, मराठी, हिंदी हे विषय शिकवणाऱ्या मयुर दंतकाळे व इतर शिक्षकांना मुलांचं होणारं नुकसान लक्षात येतं होतं. सुरुवातीला शाळेतील शिक्षकांनी गावातील मुलांचा सर्वे करत किती जणांकडे Whats App ची सुविधा असलेला स्मार्ट फोन आहे याचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात फक्त ९० मुलांकडे स्मार्टफोन असल्याचं दंतकाळे यांना समजलं. काही मुलांच्या पालकांकडे फक्त कॉलिंगची सुविधा असलेला तर काही मुलांच्या पालकांकडे फोनच नव्हता. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये याकारणासाठी गावातील मंदिर आणि मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना धडे शिकवायचे ही कल्पना दंतकाळे यांना सुचली.
करोनामुळे सरकारचे नवे नियम आणि पोलिसांची भीती यामुळे सुरुवातीला दंतकाळे यांना त्रास झाला. पण यानंतर दंतकाळे यांनी शाळेच्या माध्यमातून पत्र लिहून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून फक्त आणि फक्त अभ्यासाच्या गोष्टी शिकवल्या जातील अशी हमी दिली. यानंतर बादोले गावात मंदिराच्या लाऊडस्पीकरवरुन शाळा सुरु करण्यात आली. काही दिवसांपूर्वी गावातील मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुनही पाढे आणि कविता ऐकवण्यात आल्या होत्या. “यू-ट्युब व्हिडीओचं एडिटींग करणाऱ्या एका मित्राला मी भेटलो. त्याला बालभारतीच्या सर्व मराठी कवीता MP3 फॉर्ममध्ये कन्वर्ट करुन द्यायला सांगितलं. याचसोबत मुलांसाठी २ ते ३० चे पाढेही त्यात टाकायला सांगितले. या सर्व गोष्टी हातात आल्यानंतर सकाळी सात ते नऊ या वेळात लाऊडस्पीकरवरुन मुलांना अभ्यासाच्या गोष्टी शिकवल्या जातात. याव्यतिरीक्त ज्या मुलांकडे Whats App ची सुविधा उपलब्ध आहे त्यांना Whats App ग्रूपमध्ये MP3 फॉर्ममध्ये अभ्यास पाठवला जातो.” लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दंतकाळे यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली.
महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शाळेत असताना कधी एकदा सुट्टीचा दिवस येतोय असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं. परंतू करोनामुळे गेले काही महिने विद्यार्थी घरातच बसून असल्यामुळे आता शाळेत सरांचं, “शांत बसा रे…अभ्यास करा, वाचन करा” हे ओरडणं मुलांना हवंहवसं वाटत आहे. या उपक्रमाव्यतिरीक्त मयुर दंतकाळे यांनी गेल्या काही वर्षांपासून पत्रलेखनाची चळवळ सुरु केली आहे. महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्ती, लेखक, चित्रकार, शास्त्रज्ञ यांना मुलांकरवी पत्र लिहून, त्यांचे अभिप्राय दंतकाळे मुलांना वाचून दाखवतात. या उपक्रमाचा सध्याच्या घडीलाही त्यांना चांगलाच फायदा झाला. विद्यार्थ्यांशी दररोज भेट होत नसल्यामुळे कधीकधी दंतकाळे पत्राद्वारे मुलांशी संवाद साधतात आणि त्यांचे विद्यार्थीही त्यांना तितकाच चांगला प्रतिसाद देतात.
मुलांच्या शिक्षणात खंड पडता कमा नये हा एकमेव उद्देश या उपक्रमामागे असल्याचं मयूर दंतकाळे यांनी सांगितलं. “या कामात शाळेचे मुख्याध्यापक सुनील गुमास्ते सर, अध्यक्ष मल्लीनाथ बगले, सचिव माधव कुलकर्णी, सोनकर सर आणि माझे सर्व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य मिळतं. याचसोबत शाळेतील माजी विद्यार्थ्यांचाही या कामात खूप हातभार मिळतो. शिक्षकेतर कर्मचारी दररोज मंदिरात जाऊन लाऊडस्पीकरवर पाढे आणि कविता लावतात”, असं दंतकाळे यांनी सांगितलं. एकीकडे संपूर्ण देश डिजीटल होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. पण गावखेड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ई-शिक्षण पोहचंतय की नाही हे पाहणंही तितकच महत्वाचं आहे. अनेकदा सरकारी घोषणा आणि योजना या गावातील तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहचतच नाहीत. परंतू मयुर दंतकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातला विद्यार्थीही सध्याच्या खडतर काळात शिक्षणाची कास धरुन आहे. या उपक्रमाचं कौतुक करावं तिकचं कमीच आहे.