सावंतवाडी : जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाल्यानंतर युनेस्कोच्या पथकाने आज मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली. यावेळी या पथकाचे किल्ला रहिवासी, शिवप्रेमींच्यावतीने पारंपरिक वाद्ये वाजवून जल्लोषी स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी पर्यटन विकास महामंडळाच्या आरमार या बोटीद्वारे या पथकाने समुद्रात चहुबाजूने किल्ले सिंधुदुर्गची पाहणी केली. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग येथे तटावरून किल्ल्याची पाहणी केली. शिवराजेश्‍वर मंदिरास भेट देत स्थानिक किल्ला रहिवाशांशी संवाद साधला.

जागतिक वारसा स्थळात किल्ले सिंधुदुर्गला मानांकन मिळाल्याबद्दल किल्ला रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. किल्ल्याचा विकास करताना पारंपरिकता जपली जावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली तर प्रेरणोत्सव समितीच्यावतीने किल्ल्याच्या विकासासाठी पोर्तुगालकडून आवश्यक नकाशे मिळविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – Ratnagiri : रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी राडा, उदय सामंतांना भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

पथकात जापनीज प्रमुख अधिकारी श्री. ली, राज्य पुरातत्व विभागाचे संवर्धन अधिकारी शुभ मुजुमदार, जानवी शर्मा, शिखा जैन, केंद्र सर्वेक्षण पुरातत्व विभागाचे अन्य अधिकारी यांच्यासह पर्यटन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी दीपक माने, प्रांत ऐश्‍वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, वायरी भुतनाथ सरपंच भगवान लुडबे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्षा ज्योती तोरसकर आदी उपस्थित होत्या.

किल्ले सिंधुदुर्गची पाहणी केल्यानंतर या पथकाने किल्ल्यातील रहिवाशांशी संवाद साधला. किल्ल्याला जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाले ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या किल्ल्याचा विकास होत असताना अत्याधुनिक बांधकामे न होता ती पारंपरिक पद्धतीचीच असावी अशी अपेक्षा आहे. युनेस्कोने या किल्ल्याच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त करत समाधानी असल्याचे स्पष्ट केले. जुन्या ज्या चालीरिती आहेत त्या तशाच सुरू राहाव्यात. यात प्रामुख्याने या जमिनीत नांगर फिरविला जात नाही. दहन केले जात नाही. किल्ले सिंधुदुर्ग हा सर्वधर्मसमभावाचे एक केंद्र आहे. या किल्ल्यात हिंदूसह मुस्लिम बांधवही वास्तव्यास आहेत. मोहरम सणाची सुरवातही किल्ले सिंधुदुर्गमधून होते. किल्ल्यातील महादेव मंदिरातून एक भुयारी मार्ग आहे. घोड्यावर बसून माणूस जाईल एवढा मोठा हा भुयारी मार्ग आहे. त्याची युनेस्कोच्या माध्यमातून शोध घेतला जावा. किल्ले सिंधुदुर्गला जागतिक वारसा स्थळात नामांकनासाठी आमचा विरोध नाही उलट आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे असे रहिवाशांनी स्पष्ट केले. या संवादानंतर या पथकाने महादेव मंदिराच्या ठिकाणी भेट देत भुयारी मार्गाविषयीची माहिती घेतली.

पोतुर्गालकडून नकाशे मिळविणे आवश्यक आहे. जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाल्याने किल्ले सिंधुदुर्गची पाहणी करण्यास आलेल्या युनेस्कोच्या पथकातील प्रमुख अधिकार्‍यांनी प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्षा आणि इतिहास संशोधिका ज्योती तोरसकर यांच्याशी संवाद साधला. किल्ले सिंधुदुर्गमधील जैवविविधतेचे महत्त्व, किल्ला बांधणी किती महत्त्वाची होती. त्याला संरक्षक असणारे पद्मदुर्ग, सर्जेकोट आणि राजकोट हे किल्ले बांधले गेले आणि निवती किल्ल्यांचीही सुधारणा केली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या दृष्टीने किल्ले सिंधुदुर्ग किती महत्त्वाचा होता याची माहिती दिली. किल्ले सिंधुदुर्ग ही आरमाराची राजधानी होती.

हेही वाचा – रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस, रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या कामांची पोलखोल

किल्ले सिंधुदुर्ग एवढाच पद्मदुर्गही महत्वाचा आहे. कारण याच दुर्गावरून युद्धे झाली आहेत. किल्ले सिंधुदुर्गचा विकास करताना किल्ल्यातील आराखडे, नकाशे मिळविणे गरजेचे आहे. यादृष्टीने पोर्तुगालची लिझबनचे अभिलेखाधार आहेत त्यांच्याशी गेली काही वर्षे संपर्कात आहे. यात काही नकाशे मिळाले आहेत अजूनही काही नकाशे मिळविण्याची नितांत गरज आहे. पोर्तुगीजांनी पहिले आक्रमण किल्ले सिंधुदुर्गवर केले. त्यावेळी त्यांनी नकाशे बनविले होते. पोर्तुगीज युद्धात हरले. त्यामुळे त्यांनी अधिक अभ्यास करून नकाशे बनविले. हे नकाशे जर प्राप्त झाले तर युनेस्कोला त्याचे संवर्धन करताना एक चांगले मार्गदर्शन मिळेल. प्रेरणोत्सव समितीने जनजागृतीसाठी काय काय केले याची माहितीही तोरसकर यांनी या पथकाला दिली.

भविष्यात मालवणवासियांना काय अपेक्षित आहे. किल्ला कसा विकसित व्हावा त्याची एक पुस्तिका बनविली आहे. ही पुस्तिका यावेळी प्रमुख अधिकारी ली यांना देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेअंती जैन यांनी पोर्तुगालकडून आवश्यक असलेले नकाशे मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरूनाथ राणे, महा वारसा समिती सदस्य डॉ. कमलेश चव्हाण, भाऊ सामंत, रविकिरण तोरसकर, सयाजी सकपाळ, दिलीप सकपाळ, सिद्धार्थ सकपाळ, जयदीप सावंत, मंगलमूर्ती पाडावे, दीपक फाटक, मंगेश सावंत, सादिक शेख, हितेश वायंगणकर, वायरी भुतनाथ उपसरपंच प्राची माणगावकर, सदस्या ममता तळगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजित पाटील, जिल्हा माहिती अधिकारी चिलवंत, बंदर निरीक्षक गोसावी, पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व अधिकार्‍यांना किल्ले सिंधुदुर्ग येथे नेण्यासाठी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेने सहकार्य केले.