अलिबाग- रायगड जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्येचे गाव लवकरच सौर उर्जेवर स्वयंप्रकाशित होणार आहे. केंद्र सरकारच्या सोलार व्हिलेज योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या वतीने १ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने यासाठी गावाची निश्चिती करावी असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात ५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली ६० गावे आहेत. या गावांमधून एका गावाची निवड सोलार व्हिलेज प्रकल्पासाठी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचयात विभागाने महावितरणच्या मदतीने गावाची निवड करावी, स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करावी, सकरात्मक सहभाग देण्याची तयारी असलेल्या गावाची या योजनेसाठी निश्चिती करावी असे निर्देश त्यांनी दिले. ते प्रधानमंत्री सुर्यघर योजनेच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता राजाराम माने, अधीक्षक अभियंता संजय पाटील कार्यकारी अभियंता शैलेश कुमार, उपमुख्य कायकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग राजेंद्र भालेराव आदी उपस्थित होते.

हेही वाचा – धाराशिव : ओबीसीतूनच आरक्षण द्या! जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद

२०३० पर्यत देशात अपारंपरिक उर्जा स्त्रोतामधून ५०० मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातील पन्नास टक्के वीज निर्मिती सोलारच्या माध्यमातून व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन घरोघरी सौर उर्जेतून वीज निर्मिती करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठीच प्रधानमंत्री सुर्यघर योजनेची सुरूवात करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत रायगड विभागासाठी १ लाख १६ हजार १०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र ऑगस्ट अखेरपर्यंत ३ हजार ७२३ जणांनी योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री सुर्यघर योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत १ हजार ८४९ ग्राहकांनी या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश शेळके यांनी दिले आहेत. सुर्यघर योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करावेत, बँकांनी या प्रकल्पासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश डॉ. शेळके यांनी दिले.

हेही वाचा – Dharavi Masjid : “…म्हणून हिंदू-मुस्लीम दंगल घडविण्याचा सरकारचा शेवटचा प्रयत्न”, धारावी प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची टीका

शेतकऱ्यांकडून सौर पंप योजनेला अत्यल्प प्रतिसाद

उर्जा सौर घर योजनेप्रमाणेच रायगड जिल्ह्यात सोलार पंप योजनेला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात १५३ जणांनी सौर पंपासाठी अर्ज केले असून, ५३ अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाले आहेत. त्यामुळे जेमतेम शंभर लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.