कराड : कराडला पुणे-बंगळूरू महामार्गाशी जोडणाऱ्या आणि ब्रिटिशांनी कोयना नदीवर उभारलेल्या कराडच्या १५४ वर्षे जुन्या कोयना पुलाच्या सक्षमतेची हमी संपली असून, तो केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठीच खुला आहे. परंतु, लवकरच हा पूल कात टाकणार आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून जुन्या कोयना पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे, की स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीने सन १८७१ च्या सुमारास जुन्या कोयना पुलाची उभारणी केली. कराडला जोडणारा हा प्रमुख दुवा राहिला. लोखंडी व दगडी बांधकाम असणारा हा पूल कमानी स्वरूपाचा असल्याने त्याची वेगळी ओळख आहे. नदीपात्रातील बांधकामही दगडी असून, वरील भाग लोखंडी आहे.

तब्बल १५४ वर्षे पूर्ण झाल्याने हा पूल कुमकुवत होताना, अनेक वर्षांपासून अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. अलीकडे पुलाची जुजबी दुरुस्ती झाली. पण, पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकलेला नाही. हा पूल दुपदरी असल्याने त्यावर नेहमी वाहतूककोंडी उद्भवते. तसेच महामार्गावरील पुलाचे कामही सुरू असल्याने नव्या कोयना पुलावर आणि कोल्हापूर नाक्यावरही वाहतूककोंडी सतत होत असते.भविष्यातील वाहतुकीचा विचार करता कराडमध्ये येण्यासाठी जुन्या कोयना पुलाच्या जागी नवा पूल उभारण्याची गरज ओळखून, त्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसलेंनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. या प्रश्नी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासमोर नव्या पुलाच्या उभारणीबाबतची वस्तुस्थिती मांडली. त्याची दखल घेत, जुन्या कोयना पुलाच्या जागी नवीन चारपदरी पुलाच्या उभारण्यासाठी केंद्रीय रस्ते, पायाभूत सुविधांतर्गत ५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

ब्रिटिशकालीन स्थापत्य

ब्रिटिशकालीन स्थापत्यकलेचा उत्तम आविष्कार असलेला हा पूल आजही मजबूत स्थितीत दिसतो आहे. परंतु, पुलाच्या उभारणीतील अभियंत्यांनी ठरवून दिलेल्या सक्षमतेची हमी संपल्याने हा पूल अनेक दशके चारचाकी व अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला. परंतु, महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाहनकोंडीची समस्या टाळण्यासाठी पुलाची सक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करून आणि योग्य ती तपासणी करून सध्या पुलावरून चारचाकी वाहनांचीही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अगणित वाहनधारक, प्रवाशांसाठी हा पूल महत्त्वपूर्ण ठरल्याने त्यांच्याशी त्याचे भावनिक नातेही जडले गेले होते. नव्या पुलाच्या उभारणीत हा जुना पूल इतिहासजमा होणार असल्याची स्वाभाविकपणे सल राहणार आहे. हा पूल दगडी, लोखंडी बांधकामातील भक्कम पूल असून, त्याचे पोलाद, लोखंड व दगड यातून नव्या पुलाचा बराच खर्च निघेल. जुन्या पुलाचे हे साहित्य नव्या पुलाच्या उभारणीतही वापरात येऊ शकेल, असा तर्क बांधला जात आहे.