शर्वरी जोशी

करोना विषाणूमुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे या बंदचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांवर झाल्याचं दिसून आलं. यात अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प झाले. परिणामी, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. सहाजिकच या परिस्थितीने त्रस्त झालेले अनेक जण नैराश्यग्रस्त झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या कठीण प्रसंगामध्येदेखील एका अवलियाने जिद्द न हारता थेट शेतात जाऊन मातीचं सोनं केलं आहे. विशेष म्हणजे काळ्या मातीत राबणाऱ्या आशिष पवार या तरुणाने लॉकडाउनच्या काळात करिअरची नवीन वाट निवडली आहे. त्यानिमित्ताने आशिषने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या नव्या योजनेबद्दल आणि एकंदरीत प्रवासाबद्दल चर्चा केली आहे.

सध्याच्या काळात पाहायला गेलं तर मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी नोकरी करण्यासाठी येणाऱ्या तरुणांचा कल वाढल्याचं पाहायला मिळतं. मात्र यावर्षी करोनाच्या संकटामुळे अनेक तरुणांना त्यांची नोकरी गमवावी लागली. परिणामी, या परिस्थितीत रोजगाराचं साधन म्हणून अनेकांनी त्यांच्या करिअरच्या नव्या वाटा निवडल्या. मात्र यात कोकणातील आशिष पवार या तरुणाने ‘खेड्याकडे चला’, असं म्हणत पूर्वापार चालत आलेली शेतीची परंपरा पुन्हा एकदा सुरु केली आणि त्यातून नवा रोजगार निर्माण केला आहे. विशेष म्हणजे आशिषने ३२ गुंठा जागेत त्याचा मळा फुलवला असून यात पावसाळी पिकांपासून ते अनेक नवीन प्रयोग त्याने या शेतीत केले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या शिवणे या लहानशा गावात राहणारा आशिष नोकरीनिमित्त नाशिकमध्ये राहत होता. मात्र लॉकडाउनचा कालावधी सुरु झाला आणि परिणामी नोकरीवर गदा आली. हातची नोकरी सुटल्यामुळे आणि ती पुन्हा सुरु होईल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे आशिषने गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात त्याला घरातल्यांची साथ मिळाली असून आज हा युवा शेतकरी आधुनिक पद्धतीने शेतात नवनवीन पिक घेताना दिसत आहे.

“मी नोकरीनिमित्त नाशिकमध्ये कार्यरत होतो. मात्र लॉकडाउमुळे हातची नोकरी गमवावी लागली. त्यातच सध्याची परिस्थिती पाहता नवीन नोकरी मिळणं शक्य नसल्यामुळे मी गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ६० हजारांची गुंतवणूक केली आणि हळूहळू हा व्यवसाय वाढू लागला आहे. सध्या आमची ३२ गुंठे जागा आहे आणि त्यातच आम्ही आधुनिक पद्धतीने शेती करतोय. खरं तर कोकण पारंपारिक पद्धतीने शेती करण्यासाठी ओळखलं जातं. पण आम्ही आधुनिक पद्धतीचा वापर करुन व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. सध्या आम्ही पावसाळी पिकांपासून ते भेंडी, गवार,मिरची अशा काही भाज्यांचीदेखील पिकं घेत आहोत”, असं आशिषने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “आता आम्ही हळूहळू व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे फारसे मजूर आमच्याकडे नाहीत. आम्ही घरातली मंडळीच मिळून शेतीची सगळी कामं करतो. तसंच शेतीसाठी लागणारी बियाणे आणि खते दापोली कोकण कृषी विद्यापीठातून खरेदी केली आहेत. सध्या आम्ही लोकल मार्केटमध्ये भाजीची विक्री करतोय. मात्र अनलॉक झाल्यानंतर हा व्यवसाय वाढवणार आहोत. मुंबई, पुणे अशा ठिकाणी जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपला माल तिथे विकता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आता अनलॉक जरी झालं तरी आम्ही शेतीच करणार आहोत”.
लाल मातीत राबणाऱ्या आशिष पवार याने तरुणांसाठीदेखील एक खास संदेश दिला आहे. अनेकांच्या मते कोकणात रोजगार नाही असं म्हटलं जातं. परंतु, आपल्याला मातीत आणि आपल्या कोकणात खूप वैभव आहे. अनेकांच्या हातात उत्तम कला आहेत. फक्त प्रत्येकाने आपल्यातील कला ओळखली पाहिजे. त्यामुळे सहाजिकचं आपल्याबरोबरच आपल्या कोकणाचादेखील विकास होईल.

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात शेती करत आशिषने त्याच्या करिअरच्या वाटा अनलॉक केल्या आहेत. खरंतर आशिषने एक ज्वलंत उदाहरण नोकरी गमावलेल्या तरुणांपुढे ठेवले आहे. वाईट परिस्थितीत आणि संकटात खचून न जाता त्याला धैर्याने सामोरं जावं हेच आशिषच्या या कामगिरीतून दिसून येत आहे.

Story img Loader