सोलापूर : प्रेयसीने लैंगिक छळप्रकरणी केलेल्या आरोपामुळे लग्न झाल्यानंतर ‘सुहागरात’ कारागृहात काढाव्या लागलेल्या माढा तालुक्यातील नवविवाहित तरुणाची जामिनावर मुक्तता झाल्यामुळे त्यास सासूरवाडीला पहिल्या दिवाळी सणाचा मानाचा पाहुणचार घेता आला.या अफलातून खटल्याची पार्श्वभूमी अशी की, शेटफळ-कुर्डूवाडी रस्त्यावरील एका गावातील तरुणाचा विवाह झाला. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पश्चात विधी चालू असतानाच पोलिसांची गाडी घरासमोर येऊन धडकली आणि पोलीस गाडीतून नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्याला गेली. नवरदेवाला समजेना काय झाले. पोलीस ठाण्यात त्यास समजले की, त्याच गावातील एका तरुणीने त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. आरोपी तरुणाचे माझे दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. काल मी बहिणीच्या घरी गेले असताना आरोपी तेथे आला आणि त्याने माझा लैंगिक छळ केला, असा आरोप त्या तरूणीने केला होता.
त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावली गेली आणि नवरदेवास सुहागरात कारागृहातील बंद कोठडीत काढावी लागली. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याने ॲड. धनंजय माने आणि ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत बार्शी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आरोपीविरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप असंभवनीय आहेत. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी कोणताही नवरदेव असले कृत्य करणे शक्य नाही. आरोपीला या खटल्यात जाणीवपूर्वक गुंतविण्यात आले आहे, असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करून आरोपीची जामीनवर मुक्तता करण्याचे आदेश दिले. सुहागरात कारागृहातील कोठडीत काढणाऱ्या नवरदेवास न्यायालयाने दिवाळीची सुट्टी सुरू होण्याच्या शेवटच्या दिवशी जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला. त्यानंतर नवरदेवास पहिल्या दिवाळी सणाचा सासरवाडीत मानाचा पाहुणचार घेता आला.