रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटी परिसरात पिशवी विकत घेण्यावरुन तरुणाला व त्याच्या भावाला विक्रेत्याकडून मारहाण करण्यात आल्याने दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
मिरकरवाडा जेटी परिसरात पिशवीच्या खरेदीवरून सुरू झालेल्या या वादाने हिंसक वळण घेतले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ येथील वातावरण शांत करत याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला. या घटनेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात मारहाण झालेल्या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आल्यावर रुग्णालयात मोठी गर्दी जमली.
मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, मिरकरवाडा जेटीवर एका तरुणाने पिशवी विक्रेत्याकडून ३ रुपयांची पिशवी खरेदी केली. मात्र ग्राहकाकडे सुट्टे पैसे नसल्याने त्याने गुगल पे द्वारे पैसे देतो असे सांगितले. त्यासाठी विक्रेत्याकडे क्यूआर कोड मागितला. मात्र, विक्रेत्याने याला उद्धटपणे उत्तर दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसन हाणामारीत झाले. वाद वाढल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. सुमारे ३० ते ४० जणांच्या जमावाने हल्ला करत त्या तरुणाला व त्याच्या भावाला मारहाण केल्याचे तरुणाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मारहाण झालेला ग्राहक हा विशिष्ट धर्माचा असल्याने त्याला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप काही उपस्थितांनी केला आहे. यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याची शक्यता निर्माण झाली होती. घटनेनंतर ग्राहक आणि त्याच्या साथीदारांनी थेट जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, तर पिशवी विक्रेत्याने आधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि नंतर रुग्णालयात दाखल झाला. या सर्व प्रकारानंतर दोन्ही गट जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. जिथे त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली. यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालय परिसरात पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.