सोलापूर : कोल्हापूर, नगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये जातीय दंगली घडविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून शांतता बिघडविण्याचे प्रयत्न होत आहेत. औरंगजेबाची छबीचे समाज माध्यमावर स्टेटस ठेवून आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीत तरूणाला लव्ह जिहादच्या संशयावरून एका टोळक्याने पळवून नेऊन हल्ला केला होता. त्यानंतर औरंगजेबाच्या छबीचे समाज माध्यमावर स्टेटस ठेवण्याचा प्रकार अक्कलकोट रस्त्यावरील गोदूताई परूळेकर विडी घरकुलात घडला आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तरूणाला अटक केली असता त्यास न्यायदंडाधिका-यांनी १२ तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनपल्ले यांनी ही माहिती दिली.
सोलापूर शहरात मागील तीन महिन्यांपासून विविध सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने हिंदू संघटनांकडून शक्तिप्रदर्शन होत आहे.चिथावणीखोर भाषणे केली जात आहेत. यातून तरूणींना दुस-या धर्माच्या तरूणांबरोबर फिरण्यास, बोलण्यास मनाई केली जात आहे. यात दुस-या धर्माच्या तरूणांना गाठून हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच गोदूताई परूळेकर विडी घरकूल परिसरात राहणा-या एका तारूणाने स्वतःच्या व्हाटस्अपच्या स्टेटसवर औरंगजेबाची छबी ठेवल्याचे उजेडात आले. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलीस प्रशासनावरील जबाबदारी वाढल्याचे दिसून येते.