छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श बँक घोटाळ्यामुळे बँकेच्या खातेदारांचं झालेलं नुकसान अद्याप भरून निघालं नसल्यामुळे खातेदारांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळत आहे. हा संताप आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयाच्या बाहेर दिसून आला. आज दुपारी विभागीय आयुक्तालयाबाहेर मोठ्या संख्येनं बँकेचे खातेदार जमा झाले होते. आयुक्तालयामधून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटता यावं, अशी मागणी हे खातेदार करत होते. मात्र, त्यांना आत जाण्यास परवानगी न दिल्यामुळे काही खातेदारांनी चक्क बॅरिकेट्स आणि गेटवरून उड्या मारून कार्यालयात प्रवेश केला.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच जुलै २०२३ मध्ये आदर्श बँकेत मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं. बँकेच्या व्यवहारांमध्ये तब्बल २०० कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यात प्रामुख्याने बँकेच्या संचालक मंडळाने वेगवेगळ्या संस्थांच्या नावे कर्ज काढून बँकेचं २०० कोटींचं नुकसान केल्याची तक्रार झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, यानंतर गुंतवणूकदार व खातेदारांच्या पैशांचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.

पैसे परत मिळतील असं आश्वासन तेव्हा सरकारकडून देण्यात आलं होतं, असा दावा आता खातेदार करत आहेत. आज विभागीय आयुक्तालयाच्या बाहेर जमा झालेल्या काही आंदोलकांनी यासंदर्भात वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आमचे पैसे परत मिळतील असं आश्वासन देऊनही अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी व्यथा आंदोलकांकडून मांडण्यात येत आहे.

खासदार इम्तियाज जलील आंदोलनात सहभागी

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हेदेखील या आंदोलनात खातेदारांसह सहभागी झाले होते. यावेळी विभागीय आयुक्तालयातून अधिकारी जर चर्चेसाठी आले असते, तर एवढा गोंधळ झाला नसता, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.