टपाल विभागाची महसुली सेवा क्षेत्रात भरारी

देशभरात टपाल विभागाने आधारकार्ड दुरुस्तीची कामे करण्याचा निर्णय घेतला असून नवीन आधारकार्ड नोंदणीची सेवा देण्याची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या असूनही टपाल विभागाने बँकिंग सेवेबरोबरच आता महसुली सेवा क्षेत्रातही भरारी घेतली आहे. साहजिकच आधारकार्ड वितरण करणारे आता आधारकार्ड काढूनही देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर येथील तालुका टपाल कार्यालयात आधारकार्ड दुरुस्तीचीही सेवा सुरू करण्यात आली आहे. देवरुख येथेही लवकरच ही सेवा सुरू होणार असून टप्प्याप्प्याने संपूर्ण जिल्ह्यातल तालुका टपाल कार्यालयात त्याची अंमलबजावणी होणार आहे. ही सेवा यशस्वीपणे कार्यान्वित झाल्यानंतर नवीन आधारकार्ड नोंदणीचेही काम टपाल कार्यालयांत सुरू होणार आहे. मुळात आधारकार्डची कामे महसुली संबंधित सेवा क्षेत्रात समाविष्ट होतात. त्याचे व्यवस्थापन खासगी कंत्राटी कंपनीकडून होत असले तरी प्रशासकीय यंत्रणेवरील कामाचे ओझे वाढू न देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या पाश्र्वभूमीवर टपाल कार्यालयांचे गावोगाव पसरलेले जाळे आणि विश्वासार्हता लक्षात घेऊन आता आधारकार्डची कामे टपाल विभागाकडे देण्यात आली आहेत. पण याची अंमलबजावणी करताना अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येवर मात्र वरिष्ठ स्तरावरून अजून कोणतीच हालचाल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात सध्या १२० टपाल कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पण नवीन योजना राबवताना याचा विचार वरिष्ठ स्तरावर झालेला नसल्याचे संकेत आहेत. जिल्ह्य़ात उपलब्ध कर्मचाऱ्यांना तातडीने प्रशिक्षण देऊन ही सेवा याच आठवडय़ात सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीच्या भरती प्रक्रियांत आलेल्या अडचणींमुळे मनुष्यबळाचा तुटवडा येथील सर्वच कार्यालयात जाणवतो आहे. मात्र याही परिस्थितीत ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या टपाल विभागाने आता महसुली सेवेचे मानाचे पानही आपल्या शिरपेचात खोवले आहे. यापूर्वी बँकिंग सेवांमुळे लोकांची टपाल कार्यालयातील रीघ वाढलेली होती. आता आधारकार्डच्या कामांमुळे यात आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सेवेबाबत माहिती देताना रत्नागिरीचे पोस्टमास्तर रवींद्र दामले यांनी सांगितले की, या नवीन सेवेमुळे पोस्टातही आधारकार्ड दुरुस्ती शक्य होणार आहे. एकाच अर्जावर फोटो, पत्ता, जन्मतारीख, दूरध्वनी अशा विविध दुरुस्तीची माहिती अर्जदाराला भरावी लागेल. या सेवेसाठी फक्त २५ रुपये आकारले जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिक मोठय़ा संख्येने या सेवेचा लाभ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुरुवातीला आधारकार्ड नोंदणीच्या वेळीच सदोष माहिती भरली गेल्याने आज दुरुस्तीची नामुष्की कार्डधारकावर येऊन ठेपली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहे.

Story img Loader