Aaditya Thackeray On Sanjay Gupta : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संजय गुप्ता हे पक्षाशी काही संबंध नसताना टीव्ही चॅनल्सवर जाऊन पक्षाची बाजू मांडल्याचा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून संजय गुप्ता हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ह्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ता नाहीत. त्यांनी मांडलेली मते ही पक्षाची मते नव्हेत. माध्यमांनी ह्याची नोंद घ्यावी, अशी माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली होती.
दरम्यान संजय गुप्ता यांचा पक्षाशी काही संबंध नसताना ते काही टीव्ही चॅनलवर पक्षाची बाजू मांडत असल्याचे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे आहे. दरम्यान आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी आपण या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणालेत?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आदित्य ठाकरे यांनी पोस्ट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आदित्य ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले की, “संजय गुप्ता नावाचा तोतया हा रोगट आणि घाणेरड्या मानसिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या काही न्यूज चॅनेलच्या शोमध्ये जातो. हा लबाड माणूस पक्षाचा प्रवक्ता नाही आणि त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही हे पक्षाने अनेक वेळा स्पष्ट करूनही, हे निवडक चॅनेल्स त्याला त्यांच्या शोमध्ये आमचा ‘प्रवक्ता’ किंवा ‘समर्थक’ म्हणून बोलावतात. याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. काही युट्युब चॅनल आणि चॅनेल्सना स्वत:च्या टीआरपीसाठी अशा लबाड लोकांची गरज भासते हे लज्जास्पद आहे”, असे आदित्य ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
शिवेसना यूबीटी कम्यूनिकेशन या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून देखील गेल्या वर्षी नोव्हेंबर २१ रोजी यासंबंधी पोस्ट करण्यात आली होती. “संजय गुप्ता हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ह्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ता नाहीत. त्यांनी मांडलेली मते ही पक्षाची मते नव्हेत. माध्यमांनी ह्याची नोंद घ्यावी”, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली होती. असे असूनही संजय गुप्ता काही टीव्ही चॅनल्सवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका मांडताना दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.