अभिनेता सुशांतसिंह राजपुतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप राणेंनी केला होता. मात्र, आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर केलाय. यात त्यांनी दिशाचा मृत्यू दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि १४ व्या मजल्यावरून पडून झाल्याचं म्हटलं. याविषयी आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (२३ नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर जाण्याआधी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, “बरोबर आहे, पण या घाणेरड्या राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. त्या चिखलात मला पडायचंच नाही. म्हणून ज्यांनी या प्रकरणात आरोप केले त्यांच्यासाठी हा अहवाल आहे.”
“या भेटीत अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते”
यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या बिहार दौऱ्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी पाटणा येथे जाणार आहे. खास करून तेजस्वी यादव यांची भेट घेत आहे. आम्ही दोघेही ३२-३३ असे एकाच वयाचे आहोत. त्याचं बिहारमध्ये चांगलं काम सुरू आहे. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. पर्यावरण आणि इतर त्यांनी हाती घेतलेल्या कामांवरही चर्चा होईल.”
नारायण राणेंनी दिशा मृत्यूप्रकरणात काय आरोप केले होते?
दरम्यान, नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. त्या प्रकरणातील आरोपींना का अटक झाली नाही. कोण मंत्री होता? का वाचवण्यात आलं? सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं,” असे आरोप नारायण राणेंनी केले होते.
हेही वाचा : “आमचे काही झाले तर…”; मुलीची बदनामी होत असल्याचे म्हणत दिशा सालियनच्या कुटुंबीयांचा इशारा
“आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणात होते अशी लोक चर्चा करतात. सचिन वाझेंनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अशी पापं करायला मुख्यमंत्री झाला होता का? आता उत्तराखंड केसबद्दल बोलता. चुकीचं झालं असेल, तर कारवाई होईल, आम्ही लपवणार नाही. मात्र, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूतबाबत केलेलं पाप विसरता येणार नाही. आता तुमची सत्ता नाही. त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जातील,” असा इशाराही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला होता.