मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात दंड थोपटले आहेत. आता त्यांना उत्तर प्रदेशमधील साधु, संत आणि महंतांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात मनसे आणि भाजपची जवळीक दिसत असली तरी उत्तर प्रदेशमध्ये वेगळंच चित्र तयार झालंय. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मी इतर पक्षांवर सहसा बोलत नाही, असं मत व्यक्त केलं. ते नांदेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजनाला आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मी इतर पक्षांवर सहसा बोलत नाही. मी येथे जे महत्त्वाचे विषय आहे त्यावर बोलेल. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येचा संघर्ष सुरू होता तेव्हापासून शिवसेना सतत तेथे जात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याआधी अयोध्येला गेले होते. त्यानंतर न्यायालयाचा निकाल आला.”

“रामराज्यासाठी अयोध्येत आशीर्वाद घ्यायला जाणार”

“न्यायालयाच्या निकालामुळे अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं निर्माण सुरू झालंय. आता संघर्ष संपेल. आता आम्ही आशीर्वाद घ्यायला जाणार आहोत. आम्ही जे महाराष्ट्रात करत आहोत, ते देशात करू इच्छित आहोत. त्या रामराज्यासाठी आम्ही आशीर्वाद घ्यायला १० जुनला अयोध्येला जाणार आहोत,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

“कोविड काळात इतर राज्यातील सर्वांची काळजी घेतली”

आदित्य ठाकरे म्हणाले, “मला वाटतं अशी अनेक सदनं आणि कार्यालयं देशातील अनेक राज्यांमध्ये असतात. यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा कोविडचा काळ होता देशातील अनेक राज्यांमधील कामगार महाराष्ट्रात होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आम्ही सर्वांनी सर्वच लोकांची काळजी घेतली.”

“महाराष्ट्रात कोणीही इतर राज्याच्या लोकांची काळजी करण्याची गरज नाही”

“कोविड काळात राज्यात इतर देशातील नागरिक असो की इतर राज्यातील कामगार असो, आम्ही सर्वांची काळजी घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही इतर राज्यातील लोकांची काळजी करण्याची गरज नाही. इथं सर्व ठीक सुरू आहे आणि सर्वजण देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करत आहेत,” असं म्हणत नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला.

“एवढ्या शुल्लक गोष्टीवर चर्चा करणं योग्य नाही”

नवनीत राणा यांनी एमआरआय विभागात केलेल्या फोटो सेशनबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण इथं एवढं चांगलं काम करत असताना एवढ्या शुल्लक गोष्टीवर चर्चा करणं योग्य नाही. महाराष्ट्र खूप मोठा आहे.”

हेही वाचा : “असली आ रहा रहा है, नकली से सावधान”, अयोध्येत शिवसेनेची पोस्टरबाजी, राज ठाकरेंवर निशाणा

“आज आपण नांदेड आणि आजूबाजूच्या परिसरासाठी १०० खाटांचं जिल्हा रुग्णालय निर्माण करत आहोत. त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. या कामाला वेग येऊन लवकरच हे काम पूर्ण होईल आणि हे रुग्णालय लोकांच्या सेवेत रुजू करू. येथे ऑपरेशन थिअटरपासून सिटीस्कॅनपर्यंत सर्व सुविधा असणार आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.