Aaditya Thackeray Marriage : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचारसभा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सोमवारी प्रचार तोफा थंडावतील. त्याआधी उमेदवार जमेल तितक्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) युवानेते आदित्य ठाकरेंचाही अंतिम टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू असून ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातंय. यामध्ये त्यांना सातत्याने त्यांच्या लग्नाविषयीही विचारलं जातंय. लोकसत्ता लोकसंवादच्या मुलाखतीतही त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी मिश्किल टिप्पणी केली आहे.
लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी विविध विषयांवर संवाद साधला. धारावी पुनर्विकास प्रकल्प, बीडीडी चाळ, लाडकी बहीण योजना, पक्षातील फूट आदी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं. तसंच, त्यांना जाता जाता दोनाचे चार हात केव्हा होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल उत्तर दिलं.
हेही वाचा >> Aaditya Thackeray Marriage : “२०२९ मध्ये निवडणूक लढव, आधी लग्न कर”, आदित्य ठाकरेंवर लग्नासाठी घरातून दबाव?
२०१९ ला तुम्ही आला होतात तेव्हा आम्ही विचारलं की दनाचे चार हात कधी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “दोनाचे चार हात झाले. काँग्रेस आणि एनसीपी सोबत आले.” ते पुढे म्हणाले, “याच कारणासाठी वन नेशन वन इलेक्शनला मी पाठिंबा देत नाही. कारण घरी एक कारण सांगू शकतो की निवडणूक जवळ आली आहे.”
गुजरातच्या हितरक्षकांना मनसेची मदत
महाराष्ट्रातील रोजगार पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये नेले त्या भाजपला मनसेने लोकसभेला पाठिंबा दिला. विधानसभेला मनसे देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देतेय. जी मनसे महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी लढतेय, असे वाटायचे. ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढत आहे, अशी टीका आदित्य यांनी केली. पुणे येथील तळेगाव येथे येणारा वेदांत-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रकल्प, मुंबईतील आर्थिक विकास केंद्र, रोहा येथील बल्क ड्रग पार्क, वैद्याकीय उपकरण निर्मिती संकुल, हिरे बाजार असे अनेक उद्याोग गुजरातमध्ये नेण्यात आले. मात्र हे उद्याोग गुजरातला जात असताना मनसेकडून कोणतीच भूमिका घेण्यात आली नाही. गुजरातच्या हिताचे रक्षण करणाऱ्यांना मनसे मदत करीत आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा >> भाजपच्या लेखी शेतकरी, विद्यार्थी शहरी नक्षलवादी! आदित्य ठाकरे यांची टीका
आमदार का फुटले ?
शिवसेनेत फूट पडल्यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले जातात. पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी होती. यामुळेच आमदार फुटले, असे बोलले जाते. पण आमदारांचे पैशांचा स्राोत बंद केल्याने ते नाराज झाले होते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले काही आमदार बदलीची कामे घेऊन यायचे. मात्र उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन बदल्या करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे पैसे मिळवायचे साधन बंद झाल्याने ते पक्षातून पळाले, असे आदित्य म्हणाले.