राजापूर-लांजा मतदारसंगाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर गुरूवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं ( एसीबी ) धाड टाकली. दुसरीकडे युवासेनेचे नेते, सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) बुधवारी ( १७ जानेवारी ) अटक केली आहे. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“देशभक्तांना अटक करण्यात येत आहे. कारण, ‘एनडीए’त ईडी, आयटी आणि सीबीआय हेच भाजपाचे मित्रपक्ष राहिले आहेत. राजवट पोकळ होत असल्यानं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हुकूमशाहांकडून तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. देश हुकूमशाहांना उत्तर देईल,” असा इशारा आदित्य ठाकरेंनी भाजपाला दिला.
“उद्या जनतेलाही तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जाईल”
“राजन साळवी यांच्यासह रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई सुरू आहे. ‘सत्यमेव जयते’साठी लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय. आता राजकीय लोकांना तर उद्या जनतेलाही तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जाईल,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : “ही तर विजयाची नांदी…”, एसीबीच्या धाडीवर बोलताना राजन साळवी म्हणाले, “शिंदे गटात…”
“…म्हणून कारवाया होत आहेत”
“राहुल नार्वेकरांचं आणि निवडणूक आयोगाचं खोटं जनता न्यायालयाच्या माध्यमातून समोर आणलं आहे. त्यामुळे कारवाया होत आहेत,” असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
हेही वाचा : “अरे सोन्या…”, गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “खोके खोके ओरडणारे…”
“थोडी थंड हवेत मजा करूद्या”
“दावोसला एक-दोन पत्रकार, मित्र आणि दलालांना घेऊन गेले आहेत. याचे फोटो समोर आले आहेत. दौऱ्यानंतर यावर खुलासा करू. थोडी थंड हवेत मजा करूद्या. नंतर हवा गरम कशी करायची, हे आम्हाला माहिती आहे,” असं टीकास्र आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डागलं आहे.