वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, सॅफ्रन, टाटा एअरबस असे काही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यातील काही प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची पिसे काढली जात आहेत. तर, हे सर्व प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळातच गुजरातला गेल्याचा दावा शिंदे-भाजपा सरकारमधील नेत्यांकडून होत आहे. यातच शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे राज्यातील गुंतवणुकीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेसाठी येण्याचे आव्हान दिलं होतं. त्यासाठी आदित्य ठाकरेंनी ‘ट्विटर पोल’ घेतला होता.
राज्यातील शिंदे सरकारला ‘खोटे सरकार’ म्हणत आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर पोल घेतला आहे. ‘घटनाबाह्य’ मुख्यमंत्री ‘वेदान्त फॅाक्सकॅान’ आणि इतर उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याबद्दल माझ्याशी समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान स्वीकारतील? तुम्हाला काय वाटतं?’ असे महाराष्ट्रातील जनतेला विचारले आहे. यावर ७४ टक्के लोकांनी ‘नाही’ तर, २६ लोकांनी ‘होय’ म्हणून मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा
हा पोल समोर आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आणखी एक ट्विट केलं आहे. “जनतेलाही या खोके सरकारवर आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. मुख्यमंत्री प्रश्नांपासून पळ काढणारे आहेत हे जनतेलाही ठाऊक आहे. पोलमधे हे स्पष्ट दिसतंय,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारी शि. ऊ. बा. ठा…”, मनसेचा उद्धव ठाकरे गटाला खोचक टोला!
दरम्यान, राज्यातील प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर कधी गेली, याची तपशीलवार माहिती आदित्य ठाकरेंनी दिली होती. तसेच तारखा आणि बातम्यांचे सदर्भ देत त्यांनी विद्यमान सरकारच्या अनास्थेमुळेच हे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याचा दावा केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर यावे. तसेच समोरसमोर चर्चा करावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते.